नवी दिल्ली: अदानी समूहाच्या लाचखोरीच्या चौकशीचा काँग्रेसने तगादा लावल्याने गुरुवारी भाजपने अमेरिकेतील अब्जाधीश गुंतवणूकदार जॉर्ज सोरॉस यांच्या राहुल गांधींशी असलेल्या कथित लागेबांध्याचा मुद्दा संसदेत उपस्थित करून काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्यातून भाजपने काँग्रेसविरोधात नवी आक्रमक रणनीती आखली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोरॉस यांच्याशी संगनमत करून राहुल गांधी मोदींचे सरकार उलथवून टाकण्याचे कारस्थान करत आहेत. राहुल गांधी हे देशद्रोही आहेत, असा गंभीर आरोप लोकसभेत भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केला. तर, राहुल गांधी व जॉर्ज सोरॉस दोन शरीर असले तरी त्यांचा आत्मा एकच आहे. हे दोघेही देशाला अस्थिर करत आहेत, असा घणाघाती हल्लाबोल भाजपचे खासदार संबित पात्रा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

हेही वाचा >>> Varanasi college  : शुक्रवारच्या नमाज पठणाविरोधात हनुमान चालीसाचा जप, महाविद्यालयात तणाव, कुठे घडली ही घटना?

शोध पत्रकारिता करणारी ‘ओसीसीआरपी’ या आंतरराष्ट्रीय संस्थेला सोरॉस आर्थिक निधी पुरवतात. राहुल गांधी ‘ओसीसीआरपी’ संस्थेचे हितसंबंध जपतात. या माध्यमातून ते सोरॉसच्याही हितसंबंधाना मदत करत असतात. हेच सोरॉस सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात भाष्य करत असतात. सोरॉस भारतविरोधी असून, त्यांना राहुल गांधी पाठिंबा देतात, अशी टीका पात्रा यांनी केली. पेगॅसिस, कोव्हॅक्सिन लस, हिंडनबर्गचा अहवाल, शेतकऱ्यांसंबंधातील अहवाल असे अनेक वादग्रस्त विषय राहुल गांधी व काँग्रेसच्या नेत्यांनी ‘ओसीसीआरपी’ने प्रसिद्ध केलेल्या लेखांनंतरच हाताळले. या सर्व विषयांमधून राहुल गांधींनी मोदींविरोधात आंदोलनाची भूमिका घेतली. राहुल गांधींची देशविरोधी कृत्ये सोरॉस यांच्या मदतीने केली जात आहेत, असाही आरोप पात्रा यांनी केला.

हेही वाचा >>> फ्रान्सच्या पंतप्रधानांचा राजीनामा; उजव्याडाव्यांनी एकत्र येऊन सरकार पाडल्यानंतर मोठा राजकीय पेच

लोकसभेत भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनीही राहुल गांधींना लक्ष्य केले. बांगलादेशमधील हत्यांना जबाबदार असलेले मुश्फिकुल फजल यांना राहुल गांधी अमेरिकेत भेटले. इल्हान उमर, रो खन्ना, बारबारा ली या व्यक्तींनाही राहुल गांधी भेटले. या सगळ्यांनी मोदींना विरोध केला होता. खलिस्तान निर्माण करू पाहणाऱ्या, काश्मीरचे विभाजन करू पाहणाऱ्या या मंडळींना राहुल गांधी अमेरिकेत जाऊन का भेटतात, असा सवाल दुबे यांनी केला. त्यावरून लोकसभेत गदारोळ होऊन सभागृह तहकूब करावे लागले.

गंभीर विषयांवर चर्चा आवश्यक : धनखड

● राज्यसभेत भाजपचे खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी, परदेशात देशविघातक घटकांना खतपाणी घातले जात आहे. या संदर्भात सविस्तर चर्चा केली पाहिजे, असा मुद्दा उपस्थित केला. त्रिवेदी यांची ही सूचना राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी लगेच स्वीकारली.

● जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीला धोका पोहोचवू शकणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत थारा देऊ नये. हा विषय गंभीर असून, त्यावर राज्यसभेत चर्चा झाली पाहिजे, असे धनखड म्हणाले.

● संसदेचे अधिवेशन सुरू असते तेव्हाच अदानींविरोधात हिंडनबर्गचा अहवाल कसा प्रसिद्ध होतो, मणिपूरमधील हिंसाचाराच्या चित्रफिती प्रसिद्ध केल्या जातात, शेतकरी आंदोलनावर अहवाल प्रसिद्ध होतो, अशी अनेक देशविरोधी कृत्ये वेळ साधून केली जात आहेत, असा आरोप त्रिवेदी यांनी केला.

मोदीअदानी विरोधी जाकिटे घालून निदर्शने

● संसदेच्या आवारात सलग चौथ्या दिवशी काँग्रेसने अदानी लारखोरी प्रकरणी निदर्शने केली. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेस खासदारांनी अदानी व मोदी यांना लक्ष्य करणारी जॉकेट घातले होते. या जाकिटांवर दोघांचे विमानातून एकत्र प्रवास करत असल्याचे छायाचित्र ढळकपणे छापलेले होते.

● ‘मोदी-अदानी एक है, अदानी सेफ है’ची टिप्पणी या टी-शर्टवर करण्यात आली होती. ‘मोदी अदानी प्रकरणी चौकशी करू शकत नाहीत कारण त्यांनी चौकशी सुरू केली की, मोदींना स्वत:ला चौकशीला सामोरे जावे लागेल’, अशी टीका राहुल गांधींनी संसदेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना केली. प्रियंका गांधी यांनी लोकसभेत अदानी प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp targets congress claims american billionaire george soros rahul gandhi link in parliament zws