वादग्रस्त कोळसा खाणवाटप घोटाळ्याप्रकरणी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सीबीआयपुढे हजर राहावे, अशी मागणी भाजपने बुधवारी केली. कोळसा घोटाळ्याच्या फायली गहाळ झाल्याप्रकरणी त्वरित एफआयआर नोंदविण्याची मागणीही भाजपने केली आहे.
जवळपास १.८६ लाख कोटी रुपयांच्या कोळसा घोटाळ्याच्या फायली गहाळ होणे ही गंभीर बाब असल्याचे भाजपने म्हटले आहे. या प्रकरणी सरकार अत्यंत महत्त्वाची माहिती दडविण्याचा प्रयत्न करीत असून त्यामुळे या प्रकरणातून काहीच निष्पन्न होणार नाही, असेही भाजपने म्हटले आहे.
कोळसा घोटाळ्याच्या गहाळ फायलींबाबत संसदेच्या दोन्ही सभागृहांत चर्चा घेण्याचे मान्य करण्यात आल्यानंतर सरकार आणि भाजपमध्ये सुरू असलेला वाद संपला. सदर फायली गहाळ झाल्या यावर आपला विश्वास नाही, हा चोरीचाच प्रकार आहे आणि त्यामुळे याबाबत त्वरेने एफआयआर नोंदविण्यात यावा, अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी केली.
कोळसा घोटाळ्याप्रकऱणी पंतप्रधानांच्या चौकशीची आवश्यकता – सीबीआय
याबाबत एफआयआर कधी नोंदविण्यात येणार आहे ते सरकारने स्पष्ट करावे. सरकारने एफआयआर नोंदविला नाही, तर सरकारला अत्यंत महत्त्वाची माहिती दडवून ठेवावयाची आहे हे स्पष्ट होईल, असेही स्वराज म्हणाल्या. २००६ ते २००९ या कालावधीत कोळसा खात्याची जबाबदारी पंतप्रधानांवर असल्याने ते स्वत: अडचणीत आहेत. आपण स्वच्छ असल्याचे पंतप्रधानांना सिद्ध करावयाचे असल्यास त्यांनी स्वत:हून सीबीआयसमोर येण्याची तयारी दाखवावी, असे स्वराज म्हणाल्या.
पंतप्रधानांची यामध्ये साक्ष होणे गरजेचे आहे, असे मत सीबीआयच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने व्यक्त केल्याचे मीडियाचा दाखला देत स्वराज म्हणाल्या. कोळसा खाणवाटप झाले तेव्हा या खात्याचा कारभार पंतप्रधानांकडे होता, त्यामुळे ते अडचणीत आहेत. त्यामुळे एफआयआर कधी नोंदविणार, असा सवालही स्वराज यांनी केला.
घोटाळा झालेलाच नाही – – बेनीप्रसाद वर्मा
कोळसा खाणवाटपात कोणताही घोटाळा झालेला नाही आणि ते सीबीआयच्या चौकशीतून सिद्ध होईल, असे पोलादमंत्री बेनीप्रसाद वर्मा यांनी म्हटले आहे. कोळसा घोटाळ्यात पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची चौकशी करण्याची गरज असल्याची सूचना एका तपास अधिकाऱ्याने व्यक्त केली त्याबद्दल विचारले असता वर्मा म्हणाले की, या सरकारमध्ये कोणताही घोटाळा नाही. त्याबद्दल काही साशंकता आहे का, असा सवालही त्यांनी केला. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करीत असून ती संस्थाच कोणताही घोटाळा नसल्याचे स्पष्ट करील, असेही वर्मा म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा