BJP Targets Rahul Gandhi Vietnam Tour: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं दोन दिवसांपूर्वी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झालं. त्यांच्या निधनावर देशभरातून शोक व्यक्त करण्यात आला. आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील डॉ. सिंग यांचा सन्मान करणाऱ्या आजी-माजी राष्ट्रप्रमुखांनी सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. मात्र, यादरम्यान लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी व्हिएतनाम दौऱ्यावर गेल्याचा दावा भाजपाकडून केला जात आहे. यावरून टीकादेखील केली जात आहे.
भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये टीका करण्यात आली आहे. “एकीकडे सारा देश माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त करत असताना राहुल गांधी मात्र नवीन वर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी व्हिएतनामला रवाना झाले आहेत. राहुल गांधींनी डॉ. सिंग यांच्या निधनावर राजकारण केलं”, असं अमित मालवीय यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याचबरोबर भाजपा प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनीदेखील राहुल गांधी व्हिएतनाम दौऱ्यावर गेल्याची माहिती मिळाल्याचं नमूद केलं आहे.
भाजपाच्या टीकेवर काँग्रेसचं प्रत्युत्तर
दरम्यान, भाजपाकडून राहुल गांधींच्या दौऱ्यावर करण्यात आलेल्या टीकेला काँग्रेसनं प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेस खासदार बी. मनिकम टागोर यांनी यासंदर्भात भाजपाला लक्ष्य केलं आहे. “संघवाले विषयापासून भरकटण्याचं राजकारण कधी थांबवणार? मोदींनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर ज्याप्रकारे यमुना नदीच्या काठावर अंत्यसंस्कार करण्याची परवानगी नाकारली आणि ज्याप्रकारे त्यांच्या मंत्र्यांनी मनमोहन सिंग यांच्या कुटुंबियांना बाजूला केलं, ते लाजिरवाणं आहे. जर राहुल गांधी वैयक्तिक स्तरावर कुठे जात असतील, तर त्याचा तुम्हाला त्रास का होतोय? नव्या वर्षात सुधारा”, असं या पोस्टमध्येम मनिकम यांनी म्हटलं आहे.
एकीकडे काँग्रेस व भाजपामध्ये हा वाद चालू असताना दुसरीकडे राजकीय भाष्यकार तेहसीन पूनावाला यांनीही या मुद्द्यावरून भाजपावर टीका केली आहे. “राहुल गांधींना लोकसभा विरोधी पक्षनेते म्हणून गृहमंत्री अमित शाह किंवा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याच स्तराची सुरक्षा व्यवस्था आहे. आज त्यांचा वैयक्तिक कार्यक्रम जगजाहीर करून भाजपानं त्यांचा जीव धोक्यात घातला आहे. लक्षात ठेवा, राहुल गांधींचे वडील दिवंगत राजीव गांधी किंवा त्यांच्या आजी दिवंगत इंदिरा गांधी यांची दहशतवाद्यांनी हत्या केली आहे”, अशा शब्दांत पूनावाला यांनी भाजपाला लक्ष्य केलं आहे.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या अस्थी गोळा करण्यासाठीच्या विधीवेळी किंवा त्या विसर्जित करण्याच्या विधीवेळी काँग्रेसची नेतमंडळी अनुपस्थित होती, असा मुद्दा भारतीय जनता पक्षाकडून उपस्थित करण्यात आला आहे. मात्र, काँग्रेसनं त्यावर स्पष्टीकर दिलं असून या कौटुंबिक विधीमध्ये डॉ. सिंग यांच्या कुटुंबीयांना प्रायव्हसी मिळावी, म्हणून तिथे गेलो नसल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे.