गुजरातमध्ये २००२ साली दंगल झाली. यातील दंगोलखोरांना भाजपाने धडा शिकवला आहे. त्यामुळे आजपर्यंत त्यांनी डोके वर काढण्याचे धाडस केलं नाही, असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. भाजपाने राज्यात कायम शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, असेही शाह यांनी सांगितलं. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते एका सभेला संबोधित करताना बोलत होते.
अमित शाह म्हणाले, “काँग्रेस सत्तेत असताना गुजरातमध्ये जातीय दंगली उसळल्या होत्या. पण, २००२ साली नरेंद्र मोदींनी दंगलखोरांना असा धडा शिकवला की आजपर्यंत कोणीही डोकं वर काढण्याची हिंमत केली नाही. दंगलखोर गुजरात बाहेर निघून गेले. भाजपाने गुजरातमध्ये शांतता प्रस्थापित केली.”
हेही वाचा : कर्नाटकच्या बसेसवर ‘जय महाराष्ट्र’ लिहल्याने बोम्मई संतापले; म्हणाले, “सरकारने ही आंदोलन थांबवावी अन्यथा…”
“काँग्रेसने दंगल भडकवण्याचं काम केले. त्यामुळे गुजरातमध्ये दंगली घडल्या. गुजरातमधील भाजपा सरकारने दंगलखोरांवर कडक कारवाई केली. यानंतर राज्यात शांतता प्रस्थापित झाली,” असेही अमित शाह यांनी स्पष्ट केलं.
काय घडलं होतं गुजरातमध्ये?
साबरमती एक्स्प्रेसच्या ‘एस-६’ डब्याला २७ फेब्रुवारी २००२ रोजी गोध्रा स्टेशनवर आग लावण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण गुजरातमध्ये दंगल उसळली होती. या डब्यात ५९ प्रवासी होते व त्यातील बहुतांश अयोध्याहून परतणारे कारसेवक होते. या प्रकरणी एसआयटी कोर्टाने १ मार्च २०११ रोजी ३१ लोकांना दोषी ठरवले होते व ६३ जणांची निर्दोष सुटका केली होती. तसेच ११ दोषींना फाशीच तर, २० जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. यानंतर गुजरात उच्च न्यायालयाने ११ आरोपींची फाशीची शिक्षा रद्द केली होती. या आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून त्याऐवजी त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती.