भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांचे आश्वासन; एनडीए राजवटीत अल्पसंख्य भयभीत – आझाद
बिहारमध्ये एनडीएचे सरकार आल्यास राज्यात गोवंश हत्या बंदीचा कायदा करण्यात येईल, असे आश्वासन भाजपचे ज्येष्ठ नेते सुशील मोदी यांनी दिले आहे. हिंदूही गोमांस खातात, या राजदचे नेते लालूप्रसाद यांच्या वक्तव्याचा संदर्भ मोदी यांनी दिला.
बिहार विधानसभेची आगामी निवडणूक ही गोमांस सेवन करण्याचे समर्थन करणारे विरुद्ध गोवंश हत्या बंदीची मागणी करणारे यांच्यातील सरळ लढत आहे. मात्र एनडीएचे सरकार आल्यास राज्यात गोवंश हत्या बंदीचा कायदा केला जाईल, असे मोदी म्हणाले.
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गुजरात आदी राज्यांमध्ये असलेल्या कायद्याच्या धर्तीवर बिहारमध्ये कायदा करण्यात येईल. बिहारमध्ये १४ वर्षांखालील गाईंची हत्या करण्यावर बंदी आहे, मात्र त्याची अंमलबजावणी केली नाही, असेही मोदी म्हणाले.
नितीशकुमार हे ‘मुंगेरीलाल’ : अमित शहा यांची टीका
सुपौल (बिहार)बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपशी प्रतारणा केली आणि पंतप्रधानपदाच्या लोभापायी पक्षाशी संबंध तोडले, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला आणि नितीशकुमार यांची तुलना दिवसा स्वप्नरंजन करणाऱ्या ‘मुंगेरीलाल’शी केली. बिहारमध्ये राजदच्या १५ वर्षांच्या सरकारचा कारभार ‘जंगल राज’ होता अशी टीका नितीशकुमार यांनीच प्रथम केली होती. पंतप्रधानपदाच्या लालसेपायी त्यांनी दोन वर्षांपूर्वी भाजपशी प्रतारणा केली आणि आघाडी तोडली, असे शहा म्हणाले.
‘एआयएमआयएम’च्या यादीत एक हिंदू उमेदवार
किशनगंज: बिहारच्या सीमांचल प्रदेशातील विधानसभा मतदारसंघातील सहा उमेदवारांची नावे एआयएमआयएमने सोमवारी जाहीर केली असून त्यामध्ये एका हिंदू उमेदवाराचाही समावेश आहे. पक्षाचे प्रवक्ते आणि तेलंगणमधील आमदार अहमद बालसा यांनी एका पत्रकार परिषदेत सहा उमेदवारांची नावे जाहीर केली. ज्या मतदारसंघात मुस्लीम समाजाचे प्राबल्य नाही तेथे बिगर मुस्लीम उमेदवाराला पक्षातर्फे संधी देण्यात येईल, असे बालसा म्हणाले.
आझाद यांची भाजपवर टीका
दादरी प्रकरणानंतर प्रक्षोभक वक्तव्ये करून भाजप नेते अल्पसंख्याकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी केला आहे. पक्षनेतृत्वाचा वरदहस्त असल्याशिवाय अशा प्रकारची वक्तव्ये करणे शक्य नाही, असा अप्रत्यक्ष हल्लाही आझाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चढविला.