इंदिरा गांधी पंतप्रधान असताना २५ जून १९७५ रोजी त्यांनी देशावर आणीबाणी लादली होती. हा निर्णय देशातील लोकशाहीवरील घाला होता अशी टीका करीत याविरोधात भाजपा ‘काळा दिवस’ पाळणार आहे. एनएनआयने यासंदर्भात वृत्त दिले आहे. मात्र, याला भाजपाकडून अद्याप कुठलाही दुजोरा देण्यात आलेला नाही. यासाठी भाजपाने एक कृती कार्यक्रम आखला असून या कार्यक्रमात २५ केंद्रीय मंत्री सहभागी होणार असल्याचे सुत्रांकडून कळते.
https://twitter.com/ANI/status/1008689885149097987
माध्यमांतील वृत्तानुसार, या दिवशी केंद्रीय मंत्री आणि खासदार यांच्यासह राज्यातील भाजपाचे नेते एकत्रितरित्या देशातील विविध जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. तसेच तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादण्यात कशी महत्वाची भुमिका बजावली होती. त्यानंतर देशात हा दिवस ‘काळा दिवस’ म्हणून गणला जाऊ लागला याबाबत हे नेते चर्चा करतील.
भारतात २५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७ या २१ महिन्यांच्या कालावधीसाठी आणीबाणी लागू करण्यात आली होती. भारतीय राजकारणातील हे अतिशय नाट्यमय वळण होते. यादरम्यान, लाखो लोकांना तुरुंगात टाकण्यात आले होते तसेच माध्यमांवरही बंदी आणण्यात आली होती.