हिंदू दहशतवादाच्या मुद्द्यावर माफी मागत नाही, तोपर्यंत केंद्रीय गृहमंत्री आणि लोकसभेतील नेते सुशीलकुमार शिंदे यांना ‘लक्ष्य’ करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने मंगळवारी घेतला. पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.
भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरांमध्ये दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जात असल्याचा गंभीर आरोप शिंदे यांनी कॉंग्रेस पक्षाच्या जयपूरमध्ये झालेल्या चिंतन शिबिरात केला होता. शिंदे यांनी तातडीने माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या नेत्यांनी केली. यापार्श्वभूमीवर पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये शिंदे यांच्याबाबत भूमिका ठरविण्यात आली. शिंदे यांना लक्ष्य करण्यात येणार असले, तरीही संसदेचे कामकाज तहकूब होणार नाही, याची काळजी भाजप घेणार आहे.
पक्षाचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद म्हणाले, संसदीय मंडळाच्या बैठकीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाबद्दल चर्चा करण्यात आली. बुधवारी आमच्या नियोजनाला अंतिम स्वरुप देण्यात येईल. शिंदे यांनी केलेले वक्तव्य अतिशय गंभीर आहे. त्यांनी माफी मागितली पाहिजे. त्यांचा विरोध आम्ही नक्कीच करणार आहोत. मात्र, तो कशा पद्धतीने करणार, हे आता सांगू शकत नाही.
शिंदे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजप बुधवारी जंतर-मंतरहून मोर्चा काढणार आहे. हा मोर्चा शिंदे यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी न्यावा, अशी सूचना लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा