सरकार स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ नसल्याने बी.एस.येडियुरप्पा यांनी बहुमत चाचणीच्या काहीवेळ आधी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मात्र त्याआधीच कर्नाटकच्या राजकारणात बऱ्याच नाटयमय घडामोडी घडल्या. बहुमतासाठी आवश्यक संख्याबळाची जुळवाजुळव करण्यासाठी धावाधाव करणाऱ्या भाजपाला कोंडीत पकडण्याची रणनिती काँग्रेसने आखली होती.
भाजपाकडून आपल्या आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न होतोय हे दाखवण्यासाठी काँग्रेसने सहा ऑडियो क्लिप जारी केल्या. या ऑडियो क्लिप जारी करणे त्याच रणनितीचा एक भाग होता असा दावा काँग्रेसने केला आहे. भाजपा मध्यस्थाच्यावतीने काँग्रेसला आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न करत असल्याचे समजले होते. त्यामुळे तीन दिवस आधीच ऑडियो क्लिप रेकॉर्डिंगचा प्लान बनवला होता असे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले.
बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपाने मध्यस्थावर आमदार शोधण्याची जबाबदारी सोपवली होती. जे आमदार निष्ठाबदलाला तयार होणार त्यांच्याशी स्वत: भाजपाचे वरिष्ठ नेते चर्चा करणार असल्याचे आम्हाला मध्यस्थाकडून समजले होते. आम्ही आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी याबद्दल चर्चा केली आणि भाजपाला जाळयात अडकवायचा प्लान आखला असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले.
सत्तेसाठी भाजपा कुठल्या थराला जाऊ शकते तो भाजपाचा खरा चेहरा जगासमोर आणायचा होता त्यासाठी काँग्रेसने हे सर्व केले. भाजपा नेत्यांशी चर्चा करुन त्यांना जाळयात अडकवू शकतील अशा आमदारांची आम्ही निवड केली असे या नेत्याने सांगितले. काँग्रेसने या सौदेबाजीसाठी आमदार बी.सी. पाटील यांची निवड केली. माजी पोलीस निरीक्षक राहिलेल्या पाटील यांनी अनेक कन्नड चित्रपटात भूमिका केल्या आहेत. त्यांच्याकडे असलेल्या अभिनय कौशल्यामुळे काँग्रेसने त्यांची निवड केली.
बी.सी.पाटील निष्ठा बदलून भाजपाला साथ देऊ शकतात हे मध्यस्थामार्फत भाजपा नेत्यांपर्यंत पोहोचवण्यात आले. ते आपल्यासोबत काही आमदारही आणू शकतात हे संदेश भाजपा नेतृत्वापर्यंत पोहोचवण्यात आले. त्यानुसार हे ऑपरेशन आखून अंमलबजावणी करण्यात आली. १७ मे रोजी काँग्रेस आमदारांना बसने बंगळुरुबाहेर नेण्यात येत होते. त्यावेळी पाटील यांच्या मोबाइलवर भाजपा नेत्यांचे फोन आले. त्याचवेळी कॉल रेकॉर्ड करण्यात आले. एकदा येडियुरप्पा आणि त्यानंतर श्रीरामलु राव यांच्याबरोबर बोलणे झाल्याचा त्यांचा दावा आहे.