कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे माजी नेते बी.एस.येडियुरप्पा यांच्या १३ समर्थक भाजप आमदारांनी पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल त्यांना अपात्र ठरविण्यात यावे, अशी मागणी दोन सत्तारूढ आमदारांनी केली आहे. सत्तारूढ भाजपचे आमदार बेळुरू गोपाळकृष्णन् व एम.व्ही.नागराजू यांनी विधिमंडळ सचिव पी.ओमप्रकाश यांच्याकडे यासंबंधीची याचिका दाखल केली आहे. दरम्यान, कनार्टक जनता पार्टीचे सर्वेसर्वा बी.एस.येडियुरप्पायांनी, शेट्टार मंत्रिमंडळ सत्तेवरून खाली खेचण्याचा आपला इरादा नसल्याचे येथे स्पष्ट केले.
या १३ आमदारांनी गेल्या दोन तीन महिन्यांपासून पक्षविरोधी कारवाया आरंभल्या असून त्यांना अपात्र ठरविण्यासंबंधीची याचिका आम्ही सादर केली असल्याचे गोपाळकृष्णन् यांनी पत्रकारांना सांगितले. यासंबंधीची सीडी आणि अन्य कागदपत्रे याचिकेसमवेत देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. येडियुरप्पा यांचे समर्थक असलेल्या १३ भाजप आमदारांनी आपले राजीनामे सादर करण्यासाठी गेल्या गुरुवारी विधानसभेचे सभापती के.जी.बोपय्या यांचे कार्यालय गाठले. परंतु बोपय्या त्यावेळी बंगळुरूबाहेर असल्यामुळे आमदारांचे मनसुबे फोल ठरले. त्यानंतर या आमदारांनी राजभवनात जाऊन राज्यपाल एच.आर.भारद्वाज यांची भेट घेतली आणि सभापतींकडून आपले राजीनामे स्वीकारले जातील असे पाहण्याची राज्यपालांना गळ घातली. नंतर या आमदारांनी आपले राजीनामे ई-मेलने सभापतींना पाठवून दिले.
या आमदारांनी पाठविलेल्या राजीनामा पत्राचा विचार न करता आपण केलेल्या याचिकेची प्रथम दखल घ्यावी, अशी विनंती गोपाळकृष्णन् यांनी सभापतींना केली आहे. आम्ही प्रथम ही याचिका सादर केली आहे, त्यांची राजीनामापत्रे सभापतींना मिळालेली नाहीत, असाही दावा गोपाळकृष्णन् यांनी केला. दरम्यान, शेट्टार यांच्यामागे बहुमत असून राज्यात कोणताही घटनात्मक पेचप्रसंग झालेला नाही, असे राज्यपालांनी शनिवारी स्पष्ट केले होते.
राज्याचा अर्थसंकल्प येत्या ८ फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार असून त्यापूर्वी सत्तारूढ पक्षाचे अधिकाधिक आमदार फोडून सरकारला अल्पमतात आणण्याचे जोरदार प्रयत्न येडियुरप्पा यांच्या गोटातून केले जात आहेत.
दरम्यान, कर्नाटकातील भाजपचे सरकार खाली खेचण्याचा आमचा कसलाही इरादा नाही तसेच ८ फेब्रुवारी रोजी मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात मोडता घालण्याचाही आमचा हेतू नाही, असे बी.एस.येडियुरप्पा यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले. आपल्याला असे करायचेच असते तर आपण ते आपण गेल्या ९ डिसेंबर रोजीच केले असते, असाही दावा येडियुरप्पा यांनी केला. भाजपच्या ज्या १३ आमदारांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे, त्यांना कर्नाटक जनता पार्टी मजबूत करायची असून सरकार खाली खेचण्याचा त्यांचा इरादा नाही, असे येडियुरप्पा यांनी सांगितले.
येडियुरप्पा समर्थक आमदारांना अपात्र ठरविण्याची भाजप आमदारांची मागणी
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे माजी नेते बी.एस.येडियुरप्पा यांच्या १३ समर्थक भाजप आमदारांनी पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल त्यांना अपात्र ठरविण्यात यावे, अशी मागणी दोन सत्तारूढ आमदारांनी केली आहे.
First published on: 28-01-2013 at 05:26 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp tries to pre empt yeddy supporters seeks mlas disqualification