नवी दिल्ली : भाजप भ्रष्टाचार निर्मूलनाचा बहाणा करून आम आदमी पक्षाला (आप) दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघाती आरोप ‘आप’चे राष्ट्रीय निमंत्रक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांनी यावेळी टीकेचे लक्ष्य केले.
‘आप’च्या लोकप्रतिनिधींच्या पहिल्या राष्ट्रीय संमेलनास संबोधित करताना केजरीवाल म्हणाले, की मोदी सरकार ‘आप’चे मंत्री आणि नेत्यांना भ्रष्टाचाराच्या खोटय़ा प्रकरणांत अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. गुजरातमध्ये ‘आप’ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हे भाजप पचवू शकत नाही. गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘आप’च्या वाढत्या प्रभावामुळे भाजप एवढा विचलित झाला आहे, की पंतप्रधानांचे सल्लागार हिरेन जोशी यांनी अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या मालक व संपादकांना ‘आप’शी संबंधित बातम्यांना स्थान न देण्यास सांगितले आहे. अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जाण्याची धमकीही दिली आहे.
हेही वाचा >>> मतदारांमध्ये सत्तेची मस्ती उतरवण्याची ताकद – अजित पवार
असले प्रकार बंद करण्याचा इशारा देत केजरीवाल म्हणाले, की या वाहिन्यांच्या संपादकांनी पंतप्रधानांचे सल्लागार जोशींच्या या धमकीवजा संदेशांचे ‘स्क्रीनशॉट’ प्रसृत केले तर पंतप्रधान आणि त्यांचे सल्लागार देशाला आपले तोंड दाखवू शकणार नाहीत. गुजरातमध्ये ‘आप’चे सरकार येणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. पंतप्रधान मोदी यांनी निवडणूक प्रचारांदरम्यान मोफत योजनांच्या आश्वासनांना ‘रेवडी संस्कृती’ म्हणून टीका केली होती. त्याचा संदर्भ देऊन केजरीवाल म्हणाले, की ‘आप’तर्फे देण्यात येणाऱ्या मोफत सुविधांवर टीका केली जात आहे. यामुळे देशाची अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होईल, असे सांगितले जाते. मात्र, अशा मोफत सुविधा देशहिताच्या नाहीत, असे फक्त एखादा अप्रामाणिक, भ्रष्ट आणि देशद्रोही व्यक्तीच म्हणू शकतो. मोफत सुविधांमुळे देशाची अर्थव्यवस्था नष्ट होईल, असे जर कोणी राजकीय नेते म्हणत असतील, तर त्यामागे त्यांचे हेतू चांगले नसल्याचे समजावे. केजरीवाल यांच्या आरोपांवर पंतप्रधान कार्यालयाकडून अथवा त्यांचे सल्लागार जोशी यांच्याकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.