आगामी लोकसभा निवडणुकीसाठी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा करण्यात यावी म्हणून विश्व हिंदूू परिषद आणि कुंभमेळ्यात जमलेल्या संतांच्या काही गटांच्या मागणीचा संघ आणि भाजपवर दबाव वाढत चालला आहे. कुंभमेळ्यात आयोजित वििहपच्या धर्मसंसदेच्या व्यासपीठावरून जगतगुरू रामानुजाचार्य आणि वासुदेवाचार्य यांनी पंतप्रधानपदासाठी मोदींच्या नावाच्या घोषणेची मागणी केली. मोदी पंतप्रधान होण्यास पात्र असल्याची प्रशस्ती वििहपचे आचार्य गिरीराज किशोर यांनी दिली. मात्र मोदींच्या जयजयकाराने भाजपमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
भाजप-रालोआचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदींच्या नावाला रालोआतील प्रमुख घटक पक्ष जनता दल युनायटेडचा विरोध आहे. रालोआच्या बैठकीत पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरावा, अशी मागणी जदयुचे नेते करीत असून त्यामुळे भाजप आणि जदयुमध्ये सध्या तणाव निर्माण झाला आहे.
भाजपमधील यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, राम जेठमलानी, सी. पी. ठाकूर, मुख्तार अब्बास नकवी यांनी मोदींच्या नावाचा जप सुरू केला असून त्यात विहिंपचे अशोक सिंघल आणि आता आचार्य गिरीराज किशोर असे वयोवृद्ध नेतेही सामील झाले आहेत. ऐंशीच्या वर वय झालेल्या अशोक सिंघल यांनी आता वििहपमधून निवृत्त व्हावे, अशी मागणी जोर धरू लागल्यामुळे त्यांनी मोदींचे नामस्मरण करीत स्वत:चा बचाव सुरू केल्याची चर्चा संघ आणि भाजपच्या वर्तुळात सुरू झाली आहे.
हरिद्वारमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने वििहपने धर्मसंसद भरवून संतांच्या माध्यमातून मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न चालविला आहे. धर्मसंसदेत महामंडलेश्वर विश्वेश्वरानंद यांनी मोदींची भरपूर स्तुती केली, तर मोदींची उमेदवारी जाहीर झाल्यास आपण त्यांच्या प्रचारासाठी जाऊ, असे जगतगुरू रामानुजाचार्य म्हणाले. मोदी पंतप्रधान होतील तेव्हाच अयोध्येत भव्य राम मंदिराची उभारणी होईल, असेही मत धर्मसंसदेत मांडण्यात आले. धर्मसंसदेत आपल्या नावाचा घोष व्हावा म्हणून मोदी तसेच त्यांचे समर्थक गेल्या काही दिवसांपासून सक्रिय झाल्याचे समजते.
कुंभमेळ्यातील काही साधूंच्या आग्रहावरून मोदींना एकविसाव्या शतकातील भारताच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार करणे कितपत योग्य ठरेल, याचीही भाजपच्या वर्तुळात दबलेल्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधानपदाचा उमेदवार भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत ठरेल, असे नवे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी स्पष्टपणे सांगून हा विषय तूर्तास थंड बस्त्यात टाकण्याचा प्रयत्न केला आहे, पण गेल्या आठवडय़ाभरापासून दिल्लीतील राष्ट्रीय वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून मोदींचा जमेल तसा आणि जमेल तितका जयजयकार करून त्यांच्या नावाची सतत चर्चा घडवून आणण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याच वेळी मोदींचे कट्टर विरोधक मानले जाणारे विहिंपचे प्रवीण तोगडिया यांच्याविरोधात अकबरुद्दीन औवेसींविषयी द्वेषपूर्ण भाषण केल्याबद्दल खटला का भरण्यात येत नाही, असाही सवाल मोदीधार्जिण्यांकडून उपस्थित केला जात असल्यामुळे भाजपमध्ये बेचैनी वाढली आहे.
तोगडिया मोदींसाठी अडथळा ठरू नये म्हणून त्यांच्याविरुद्ध वातावरण तापविले जात असल्याचे म्हटले जात आहे.
कुंभमेळ्यातील नरेंद्र मोदी यांच्या जयजयकारामुळे भाजपमध्ये अस्वस्थता
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा करण्यात यावी म्हणून विश्व हिंदूू परिषद आणि कुंभमेळ्यात जमलेल्या संतांच्या काही गटांच्या मागणीचा संघ आणि भाजपवर दबाव वाढत चालला आहे. कुंभमेळ्यात आयोजित वििहपच्या धर्मसंसदेच्या
First published on: 08-02-2013 at 04:14 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp unconfirtable on acclamation of narendra modi in kumbhmela