बिहार निवडणुकीतील पराभवावर दोन दिवसात चर्चा करा अन्यथा, पुढचे पाऊल उचलू, असा इशाराच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी दिला आहे.
लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा व शांताकुमार या पक्षाच्या चार ज्येष्ठ नेत्यांनी बिहार निवडणुकीतील पराभवावर मोदी-शहा यांना लक्ष्य करून पराभवाच्या कारणांवर चर्चा करण्याची मागणी केली होती. यावर एक निवेदन जारी करून यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न पक्षातर्फे करण्यात आला होता. मात्र, ज्येष्ठ नेत्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. नेतृत्वाकडून निवेदनाची नव्हे, तर चर्चेची अपेक्षा आहे. दोन दिवसात तसे झाले नाही तर लवकरच पुढचे पाऊल उचलले जाईल, असा इशाराच देण्यात आला आहे. पक्षातील भीष्माचार्याना नेमके हवे तरी काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. या नेत्यांचा राग मोदी-शहा यांच्यावर आहे. विजयाचे श्रेय लाटता तर परभावाची जबाबदारीही स्वीकारा, असे त्यांचे मत आहे. एकदा शहा यांनी पराभव स्वीकारला की, नंतर त्यांच्यावर कारवाईची मागणी करायची, असा या नेत्यांचा प्रयत्न राहील.
शहा यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत आला असून त्यांना पुन्हा हे पद मिळू नये, यासाठीही ही खेळी असण्याची शक्यता आहे. शहा यांच्या कार्यकाळात पक्षात ज्येष्ठ नेत्यांची हेटाळणी करण्यात आली. यापूर्वी हा प्रकार कधीच घडला नाही. त्यामुळे बिहारच्या मुद्यावरून शहा यांना खिंडीत पकडण्याची हीच संधी आहे, हे पाहूनच चर्चेचा आग्रह धरला जात आहे, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, बिहारमधील भाजप नेते व खासदार शत्रुघ्न सिन्हा हे सुद्धा ज्येष्ठांच्या छावणीत सहभागी झाले आहेत.
जेटलींकडून जोशींची मनधरणी
बिहार निवडणुकीवरून पक्ष नेतृत्वाविरुद्ध बंड पुकारणाऱ्या चार ज्येष्ठ नेत्यांपैकी एक नेते व माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी यांची केंद्रीय अर्थमंत्री व मोदींचे विश्वासू अरुण जेटली यांनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या भेटीमागे ज्येष्ठ नेत्यांची समजूत घालणे हा उद्देश असल्याची माहिती आहे. पराभवाची जबाबदारी निश्चित करून त्यावर चर्चा करा, अशी आग्रही मागणी ज्येष्ठ नेत्यांनी केली आहे. दोन दिवसात चर्चा न झाल्यास पुढचे पाऊल उचलू, असा इशारा देऊन या नेत्यांनी मोदी आणि शहा यांच्या अडचणी वाढविल्या आहेत.
टीकाकारांवर कारवाई करा -गडकरी
नागपूर :बिहारमधील पराभवनानंतर पक्षातील ज्या नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य केली अशा नेत्यांवर कारवाई केली पाहिजे आणि तशी मागणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे केली आहे. पराभवाला केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना जबाबदार धरणे योग्य नसल्याचे मत केंद्रीय दळवळण मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
बिहार विधानसभेचा निकाल पक्षाला अनपेक्षित होता. त्यामुळे या निकालावर पक्ष पातळीवर चिंतन केले जाईल. मात्र, पराभवामुळे जर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना दोषी धरत असेल तर ते योग्य नाही. मात्र, पक्षातील वाचाळवीरांवर कारवाई झाली पाहिजे. प्रत्येक निवडणुकीत विजय मिळेल, असे नाही. पराभव होतच राहतात. भाजप यापूर्वी पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक हरलेला आहे. त्यावेळी दोन जागा निवडून आल्या होत्या, असे सांगून गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची पाठराखण केली.