गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार होऊन एक वर्ष झाल्यानंतर विजय रुपानी यांनी मोठा खुलासा केला आहे. भाजपा हाय कमांडने आदल्या रात्रीच आपल्याला राजीनामा देण्यास सांगितलं होतं अशी माहिती त्यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे. “मला आदल्या रात्री त्यांनी सांगितलं, आणि दुसऱ्या दिवशी मी राजीनामा सुपूर्द केला,” असं ते म्हणाले. विजय रुपानी यांनी ११ सप्टेंबर २०२१ ला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
“मी त्यांना कारणही विचारलं नाही, त्यामुळे त्यांनीही सांगितलं नाही. मी विचारलं असतं तर त्यांनी नक्कीच सांगितलं असतं. पण मी नेहमीच एक शिस्तबद्ध कार्यकर्ता राहिलो आहे. पक्षाने मला जे काही सांगितलं ते मी नेहमीच केलं आहे. पक्षानेच मला मुख्यमंत्री केलं होतं. पक्षाने मला आता नवे मुख्यमंत्री येणार असल्याचं सांगितलं आणि मी आनंदाने तयार झालो,” असं विजय रुपानी म्हणाले आहेत.
पक्षाने फोन करुन आदेश दिल्यानंतर काही तासांनी आपण कोणताही विरोध न करता राज्यपालांकडे राजीनामा सोपवला अशी माहिती त्यांनी दिली आहे. “एक चांगला कार्यकर्ता या नात्याने मी कधीही पक्षाच्या विरोधात भूमिका घेतलेली नाही आणि त्यामुळेच दुसऱ्या दिवशी राजीनामा दिला. हसऱ्या चेहऱ्याने मी माझा राजीनामा सोपवला होता,” असं ते म्हणाले आहेत.
विजय रुपानी गेल्या ४९ वर्षांपासून राजकारणात आहेत. १९७३ मध्ये त्यांनी पक्षाच्या विद्यार्थी संघटनेत प्रवेश केला होता. यानंतर अनेक पदं भूषवत अखेर ते मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले होते. भुपेंद्र सिंग राज्याचे नवे मुख्यमंत्री झाल्यानंतर विजय रुपानी जेव्हा राजकोटला पोहोचले होते, तेव्हा भाजपा कार्यकर्ते आणि समर्थकांनी त्यांचं स्वागत केलं होतं. यावेळी समर्थक आणि कार्यकर्ते भावूक झाले होते.
राजकोटमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी आपण कोणताही संकोच न करता राजीनामा दिला असून, फक्त राजकोटमधील कार्यकर्तेच हे करु शकतात असं सांगितलं होतं.
पक्षाचं नेतृत्व सर्वोच्च असल्याचं विजय रुपानी सांगतात. ते म्हणतात “कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर हायकमांडच मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय घेतं. विधिमंडळ पक्षाची बैठक ही केवळ एक प्रक्रिया आहे आणि ती तशीच असली पाहिजे कारण अशा निर्णयांचा संपूर्ण पक्षावर परिणाम होतो, मग तो काँग्रेस असो किंवा भाजपा”.
“निवडणुकीनंतरही हायकमांडकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवला जातो. हायकमांड विधिमंडळ पक्षाला त्यांनी निवड केलेल्या उमेदवाराला नेता म्हणून निवडण्याचे निर्देश देते,” असं ते म्हणाले. पुढे त्यांनी सांगितलं की “हायकमांडच्या निर्णयांना लोकशाहीच्या नजरेनेच पाहिलं पाहिजे. अन्यथा प्रत्येक आमदार स्वतःला मुख्यमंत्रीपदाचा दावेदार समजू लागण्याची शक्यता आहे आणि यामुळे गटबाजी होऊ शकते. त्यामुळे हायकमांडचा निर्णय़ अंतिम असतो”.
भाजपाने रुपानी यांच्यावर आता पंजाबचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली आहे. आपल्यावरील ही जबाबदारी म्हणजे राष्ट्रीय राजकारणातील प्रगती असल्याचं ते मानतात. ते म्हणाले की, “पक्षाने मला प्रथम शहर नंतर प्रादेशिक स्तरावर जबाबदारी दिली याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान मानतो. पुढे जाऊन मला राज्य पातळीवर सरचिटणीस म्हणून चार वेळा आणि अखेर मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आता माझ्याकडे राष्ट्रीय स्तरावरील काम सोपवण्यात आलं आहे”. आपल्याला सिद्ध करण्याची ही आणखी एक संधी असल्याचं ते म्हणत आहेत.
“मी पक्षाकडे काहीही मागितलं नसताना त्यांनी सर्व काही दिलं आहे. भविष्यातही पक्ष मला जे काही सांगेल ते करण्याची माझी तयारी आहे. मी भारत आणि भाजपाचं उज्ज्वल भविष्य पाहत आहे,” असं विजय रुपानी यांनी सांगितलं.