पीटीआय, बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे भाजप सखोल विश्लेषण करणार आहे. पक्षाच्या प्रदेश शाखेतर्फे मतदारसंघनिहाय निकालांचा अभ्यास करून, त्यामागील कारणे शोधण्यात येणार असल्याचे कर्नाटकचे मावळते मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी रविवारी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र, हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव असल्याचा काँग्रेसचा दावा फेटाळून बोम्मई यांनी स्पष्ट केले, की पक्षाच्या अपयशी कामगिरीमागे अनेक घटक कारणीभूत आहेत. या सर्वाचे विश्लेषण केले जाईल. या संदर्भात लवकरच सर्व नवनिर्वाचित सदस्य व उमेदवारांची बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील, बोम्मई यांच्यासह काही भाजप नेत्यांनी रविवारी येथील पक्षाच्या मुख्यालयात चर्चा केली. त्यानंतर बोम्मईंनी सांगितले, की आम्ही या निकालांबद्दल अनौपचारिक चर्चा केली आणि विविध माध्यमांतून माहिती गोळा केली. यावेळी आम्ही एकूण निकालांचे तपशीलवारआणि मतदारसंघनिहाय विश्लेषण करण्याचे ठरवले आहे. हा पराभव आम्ही नम्रतापूर्वक स्वीकारतो. मात्र, यामागील कारणे ओळखून आम्ही दुरुस्त करू आणि पुढे जाऊ.

भाजपला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीत घट झालेली नसतानाही भाजपच्या विजयी झालेल्या संख्याबळात लक्षणीय घट झाली असल्याचे सांगून बोम्मई म्हणाले, की सर्व विजयी उमेदवारांची बैठक घेण्यात येईल. त्यानंतर आगामी काळात पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्व उमेदवारांचीही एक बैठक घेण्यात येईल. भाजप फक्त निवडणुकांसाठी सक्रिय राहणारा पक्ष नाही. पक्षाकडून संघटनेच्या बांधणीची प्रक्रिया निरंतर चालते. २०१३ मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपला फक्त ४० जागांवर यश मिळाले. मात्र, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत १९ जागांवर पक्षाला यश मिळाले. त्या तुलनेत सध्या आम्ही चांगल्या स्थितीत आहोत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही संपूर्ण तयारी करू.  

 भाजपने हिंदूत्वाच्या मुद्दय़ावर ही निवडणूक लढवली नसल्याचा दावा करून बोम्मई म्हणाले, की काही लोकांनी लावलेला हा शोध आहे. आम्ही ‘डबल इंजिन सरकार’च्या  मुद्दय़ावर निवडणूक लढलो. काँग्रेसने मतदारांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. लिंगायतबहुल भागात काँग्रेसने केलेल्या चांगल्या कामगिरीबद्दल ते म्हणाले, लिंगायत बहुल प्रदेश असो किंवा वोक्कलिगा बहुल प्रदेश असो, उमेदवारांच्या विजयामागे अथवा पराभवामागे फक्त एकच समुदाय नसतो. ते उमेदवार निवडीवर आणि स्वीकारार्हतेवर अवलंबून असते. म्हणूनच आम्ही या संदर्भात तपशीलवार विश्लेषण करणार आहोत.

‘हा मोदींचा पराभव नाही!’

कर्नाटक निवडणूक निकाल हा मोदींचा पराभव आहे, या काँग्रेसच्या दावा फेटाळताना बोम्मई यांनी स्पष्ट केले, की हा मोदींचा पराभव असूच शकत नाही. मोदी हे केवळ कर्नाटकचेच नाही तर संपूर्ण देशाचे आहेत. निवडणूक प्रचारासाठी ते फक्त येथे आले होते. कर्नाटकात काँग्रेसचा भलेही विजय झाला असेल, पण देशभरात त्यांचा पराभव झाला आहे. हा स्थानिक नेत्यांचा विजय आहे की राष्ट्रीय नेत्यांचा?

सिद्धरामैय्या, शिवकुमार यांना शुभेच्छा!

 बोम्मई यांनी रविवारी काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार सिद्धरामैय्या आणि डी. के. शिवकुमार यांना शुभेच्छा दिल्या.  विधानसभेतील विद्यमान विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या आणि काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार हे या पदाचे प्रबळ दावेदार आहेत.

जयनगरमध्ये भाजपचा १६ मतांनी विजय

बंगळुरु :  बंगळुरु शहरातील जयनगर मतदारसंघात नाटय़मय घडामोडींनंतर रात्री उशिरा भाजप उमेदवार सी.के. राममूर्ती यांना १६ मतांनी विजयी घोषित करण्यात आले. राममूर्ती यांना ५७,७९७ मते मिळाली. काँग्रेस उमेदवार सौम्या रेड्डी यांना ५७,७८१ मते मिळाली. भाजप नेत्यांनी शासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार यांनी मतदान केंद्राबाहेर आंदोलन केले.