महाराष्ट्रामधील काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेडमध्ये भाजपाने आपली ताकद पणाला लावल्याचे चित्र आहे. पंतप्रधान मोदी यांनी घेतलेल्या जाहीर सभेमुळे भाजपाचे उमेदवार प्रताप चिखलीकरांना चांगला फायदा होऊ शकतो असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
मूळचे कंधारचे असलेले आणि गेल्या चाळीस वर्षांपासून नांदेडमध्ये स्थायिक असलेले नामदेव कदम सांगतात की, २०१४ पेक्षा चव्हाणांना यावेळची निवडणूक कठीण जाऊ शकते. कारण, नांदेड शहरातून त्यांना भरघोस मते मिळतील पण, ग्रामीण भागातील मतांमुळे बाजी पलटण्याची शक्यता आहे. नांदेडमधील व्यवसायिक, व्यापारी आणि मध्यमवर्गीय मते अशोक चव्हाणांच्या पारड्यात पडू शकतात. मात्र, वंचित बहुजन विकास आघाडीमुळे भाजपाला फायदा होऊ शकतो. कारण, मुस्लिम मतदार हा नेहमी काँग्रेसच्या पारड्यात आपले झुकते माप देत आला आहे. मात्र, यावेळी वंचित बहुजन विकास आघाडीमुळे ही मते विभागण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाण आणि चिखलीकर दोन्ही मराठा समाजाचे असल्यामुळे हा मतदार दोन्हीकडे विभागला जाऊ शकतो.
मूळच्या नांदेडच्या रहिवासी असलेल्या रश्मी यांनी सांगितले की, देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसारख्या नेतृत्वाची गरज आहे. देशात सुधारणा कऱण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी पुरेसा नाही. त्यामुळे मोदींना आणखी एक संधी द्यायला हरकत नाही. अशोक चव्हाण यांचा शहरी भागातील मतदारांमध्ये प्रभाव असला तरी चिखलीकर यांचा ग्रामीण भागातील वर्चस्वामुळे लढत रंगतदार होणार असल्याचे व्यवसायाने डॉक्टर असलेल्या व्यक्तीने सांगितले.
काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी २०१४च्या मोदी लाटेतही विजयी पताका फडकावली होती. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास सध्या सातवे आसमानपर असल्याचे चित्र आहे. नरहरी यांच्याही बोलताना चव्हाणांची विकासकामे बोलत होती. ते म्हणाले, गेल्या २० वर्षांत अशोक चव्हाणांनी केलेल्या विकास कामांमुळेच जनतेने त्यांना मोदी लाटेतही निवडून दिले होते.
नांदेड काँग्रेसचा गड मानला जातो. मात्र, काँग्रेसला येथून दोन वेळा पराभवचा झटका बसला आहे. अशोक चव्हाण यांनी १९८७ मध्ये पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकली होती. त्यानंतर १९८९ च्या लढतीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. तसेच २००४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रसला येथे पराभव पत्कारावा लागला होता. दोन्ही वेळा ग्रामीण भागातील मतांमुळे काँग्रेसला पराभव पहावा लागला होता.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदार संघातून १७ लाख १९ हजार २४७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, खरी लढत काँग्रस आणि भाजपामध्येच असली तरी वंचित बहुजन विकास आघाडीचेही त्यांना तगडे आव्हान मिळताना दिसतेय.