काँग्रेस लोकविरोधी धोरणे राबवीत असल्यामुळे येत्या ४ डिसेंबर रोजी होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत दोनतृतीयांश बहुमत मिळवून भाजपच विजयी होणार आहे, असा ठाम दावा पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी गुरुवारी येथे केला. काँग्रेसच्या लोकविरोधी धोरणांना लोक उबगले असून, त्यांना आता सत्तेत बदल हवा आहे आणि त्यामुळे आम्ही केवळ विजयीच होऊ असे नव्हे, तर आम्हाला दोनतृतीयांश बहुमत मिळणार आहे. आम्ही कारभारात पारदर्शकता आणू, असे आश्वासन गडकरी यांनी दिले.
आपल्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या वाहतूकदारांच्या सभेत बोलताना गडकरी यांनी वाहतूकदारांना भाजपला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. एकाच फटक्यात समस्या सोडवू, असे आपण कधीच म्हणणार नाही, परंतु सध्यापेक्षा चौपटीने चांगले सरकार आम्ही तुम्हाला निश्चित देऊ आणि ते पारदर्शी असेल, असे आश्वासन गडकरी यांनी दिले. भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार हर्षवर्धन यांची स्वच्छ प्रतिमा असून लोकांच्या समस्या दूर करण्याकडेच त्यांचा कल असतो, असे ते म्हणाले.
आर्थिक धोरणांबद्दल काँग्रेसवर तोफ डागताना गडकरी यांनी, देशाला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी काँग्रेसकडे इच्छाशक्तीच नसल्याची टीका केली. तसे नसते तर सहा लाख कोटी रुपये दरवर्षी खर्च करून गॅस, पेट्रोल आणि क्रूड तेल आयात करण्याची आपल्यावर वेळच आली नसती, असे गडकरी म्हणाले.
आम आदमी पार्टीवर टीका करताना हा पक्ष ‘व्होट कटर’- मते फोडणारा पक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस आणि भाजपने भ्रष्ट उमेदवारांना तिकिटे दिली असल्याचे हा पक्ष म्हणतो, परंतु ज्यांना आम्ही उमेदवारी नाकारली आहे, त्यांना आम आदमी पार्टीने तिकिटे दिली आहेत. त्यामुळे अशा प्रकारे मते फोडणाऱ्या पक्षासाठी लोकांनी आपली मते वाया घालवू नयेत, असे आवाहन गडकरी यांनी केले.
दिल्लीत भाजपला बहुमतच -गडकरी
काँग्रेस लोकविरोधी धोरणे राबवीत असल्यामुळे येत्या ४ डिसेंबर रोजी होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत दोनतृतीयांश बहुमत मिळवून भाजपच विजयी होणार आहे,
First published on: 29-11-2013 at 12:37 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp will form majority govt in delhi nitin gadkari