नवी दिल्ली : आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक उद्धव ठाकरे यांची शिवसेना नव्हे तर, भाजपच जिंकेल, असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.
गटप्रमुखांच्या मेळाव्यात शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक तात्काळ घेण्याचे आव्हान दिले होते. पण, निवडणूक घेण्याची प्रक्रिया असते, त्यानुसार निवडणूक होईल. उद्धव यांनी बालिश विधाने करू नयेत, असे राणे म्हणाले. ‘मनसे’शी युती करण्याबाबत भाजपचे केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल, असेही ते म्हणाले.
कित्येक वर्षे मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे, पण, त्यांनी पालिका ‘धुऊन’ काढली, नागरिकांचे शोषण केले. महापालिकेच्या कामांमध्ये लाचखोरी झाली. जागतिक कीर्तीचे शहर बकाल केले. मुंबईचा विकास राज्यात भाजपची सत्ता असतानाच झाला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबईसाठी काहीही केलेले नाही, अशी टीका राणेंनी केली.
राज्यात सत्तेत असताना अडीच वर्षांत उद्धव ठाकरे यांना गटनेते आठवले नव्हते. त्यांनी मराठी माणसांना, शिवसैनिकांना नोकरी, व्यवसायासाठी मदत केली नाही. आजारपणात आर्थिक मदत, गरजूंना घरही दिले नाही. उद्धव ठाकरे यांनी हिंदूत्वाचा वैयक्तिक लाभासाठी उपयोग केला. मुख्यमंत्रीपदासाठी, स्वत:च्या स्वार्थासाठी भाजपशी युती तोडली. मुख्यमंत्री असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना फोन करून राणेंना भाजपमध्ये घेऊ नये, त्यांना मंत्री करू नये, असे सांगितले होते, असा दावा राणेंनी केला.
राज्यात उद्योगांसाठी पोषक वातावरण कसे निर्माण करायचे हे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना समजले नाही. उद्योग राज्यात कसे आणायचे? कर कसे कमी करायचे? उद्योगांसाठी जमीन कशी उपलब्ध करून द्यायची, हे कळले नाही. उद्योगांकडून ‘‘जे मागितले’’ ते देणे उद्योगांना परवडणारे नव्हते. त्यामुळे वेदान्त प्रकल्पासारखे मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले, असा आरोप राणे यांनी केला.
बंगला कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात
बंगल्यातील अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिकेने केलेल्या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागितली असल्याची माहिती राणे यांनी दिली. बंगल्यामधील एक इंचही बांधकाम बेकायदा नाही. द्वेषापोटी केलेली ही कारवाई आहे. मुंबईमध्ये फक्त माझेच घर पालिकेला दिसले. इतर कुठे बेकायदा बांधकामे झालेली नाहीत, असा पालिकेचा समज आहे का? अनेक शिवसैनिक, त्यांच्या नेत्यांनी अनधिकृत बांधकामे केलेली आहेत, असेही राणे म्हणाले.