गेले दोन दशकांहून अधिक काळाच्या माकपच्या राजवटीत कमी प्रमाणात झालेला विकास आणि काँग्रेसच्या रूपातील दुर्बल विरोधी पक्ष या पाश्र्वभूमीवर त्रिपुरातील जनतेने भाजपच्या पारडय़ात भरघोस दान टाकले. विकास ठप्प झाल्यानेच जनतेने माकपला सत्तेबाहेर ठेवले अशी प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त झाली.

आमच्या पिढीने लहानपणापासून डाव्यांची सत्ता पाहिलेली असल्यामुळे हा त्रिपुरासाठी स्वातंत्र्य दिन असल्याची प्रतिक्रिया आगरतळ्यात ट्रॅव्हल बुकिंग सेंटर चालवणाऱ्या देबाशिष साहा याने व्यक्त केली. लोकांनी होळी शनिवारी साजरी केल्याचे तो म्हणाला. आमच्या मुलांचे भवितव्य नष्ट करणारी डाव्यांची राजवट संपली असल्याचे काही महिलांनी साश्रुनयनांनी सांगितले. नेहमी पूर येणाऱ्या या राज्यात नद्यांवर धरणे बांधणे आणि अलीकडेच बंद करण्यात आलेले उत्तर त्रिपुरातील खोवाई व कैलाशहर विमानतळांचा विकसित करणे यामुळे या भागाचा विकास होऊन राज्यातील संपर्क व्यवस्थेत वाढ होईल, असे आगरताळ्यातील सायंदीप साहा या विद्यार्थ्यांने सांगितले.

त्रिपुराची मुख्य जीववाहिनी असलेला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ नेहमीच बंद होऊन राज्याला होणारा आवश्यक वस्तूंचा पुरवठा ठप्प होतो, त्यामुळे संपर्क व्यवस्था सुधारणे आवश्यक असल्याचे मत वरिष्ठ मुक्त पत्रकार अभिजित चक्रवर्ती यांनीही व्यक्त केले. औद्योगिक विकासाचा अभाव आणि बोकाळलेला भ्रष्टाचार हे डाव्यांच्या विरोधातील मोठे मुद्दे ठरल्याचे ते म्हणाले. डाव्यांच्या राजवटीत त्रिपुरातील परिस्थिती खालावली होती, असे एका शालेय शिक्षकाने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले. डाव्यांच्या सत्तेची सुमारे २५ वर्षे सर्वाधिक भ्रष्ट होती. केंद्राकडून मिळणाऱ्या निधीपैकी मोठी रक्कम गिळंकृत केली जात होती आणि पर्वतीय भागात काहीही विकास होत नव्हता. आरोग्यक्षेत्राची स्थिती खासकरून वाईट होती, असेही त्याने सांगितले.

त्रिपुरात बदल होणे आवश्यक होते, असे मत भारत- बांगलादेश सीमेवरील लंकामुरा खेडय़ाचा रहिवासी असलेला रिक्षाचालक पार्थो डे याने व्यक्त केले. रस्त्यांची परिस्थिती इतकी वाईट आहे की त्यावरून रिक्षा चालवणे कठीण असल्याचे त्याने सांगितले.

त्रिपुरातील खालावलेली कायदा व सुव्यवस्था स्थितीही डाव्यांच्या विरोधातील घटक ठरली. आपण निवडणुकीच्या काळात होळीसाठी घरी येत असल्याने माझ्या आईला माझ्या सुरक्षिततेबाबत चिंता वाटत आहे, असे ओडिशात अभियांत्रिकी अभ्यासक्रमात शिकणाऱ्या आणि तेथून घरी परतणाऱ्या एका तरुण मुलीने आगरतळ्याला जाणाऱ्या विमानाच्या प्रवासात या प्रतिनिधीला सांगितले.

भाजपने पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकली – येचूरी

पश्चिम बंगालपाठोपाठ त्रिपूराचा गड गमवावा लागणे ही पक्षासाठी केव्हाही चिंतेची बाब आहे. निवडणूक जिंकण्याकरिता भाजपने प्रचंड पैशांचा आणि यंत्रणेचा वापर केला होता. पैशांच्या जोरावरच ही निवडणूक जिंकल्याचा आरोप मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीत सीताराम येचूरी यांनी केला.

Story img Loader