कोलकाता येथील चितपूरमध्ये एका भाजपा कार्यकर्त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला आहे. अर्जुन चौरसिया असं मृत आढळलेल्या कार्यकर्त्याचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. कोलकात्यातील कोसीपोर परिसरात ही घटना घडली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर भाजपा आणि टीएमसीचे नेते एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप करत आहेत. ही राजकीय हत्या असल्याचा दावा भाजपाच्या नेत्यांकडून केला जात आहे. भाजपाचे अनेक पदाधिकारी आणि नेते मृत तरुणाच्या घरी जाऊन कुटुंबाची भेट घेत आहेत. भारताचे गृहमंत्री अमित शाह सध्या कोलकता येथे असून त्यांनी देखील मृताच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे.

ही घटना उघडकीस आल्यानंतर, टीएमसी नेते अतिन घोष हे देखील घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. मृत अर्जुन चौरसिया यानं नगर पालिकेच्या निवडणुकांत टीएमसीचा प्रचार केला असल्याचा दावा अतिन घोष यांनी यावेळी केला. त्यामुळे मृत कार्यकर्ता नेमका कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित होता, याबाबत शंका निर्माण झाली आहे.

दरम्यान, पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं असता, स्थानिक नागरिक आणि भाजपा कार्यकर्त्यांनी मृतदेह ताब्यात देण्यास विरोध केला. तर केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपा खासदार सुभाष सरकार यांनी याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. विशेष म्हणजे पश्चिम बंगालमध्ये यापूर्वी देखील अनेक भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत.

भाजपा कार्यकर्त्याचा मृतदेह आढळल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे घटनास्थळी पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. यावेळी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, स्थानिक नागरिक आणि भाजपा कार्यकर्त्यांनी याला विरोध केला. दुसरीकडे, मृताच्या नातेवाईकांनी शवविच्छेदन होत असताना चित्रफित तयार करण्यात यावी, अशी मागणी केली. याबाबत अधिक माहिती देताना नातेवाईकांनी सांगितलं की, मृत अर्जुन गुरुवारी घराबाहेर गेला होता, त्यानंतर तो घरी परत आला नाही. निवडणुकीपासूनच अर्जुन चौरसिया यांना धमक्या दिल्या जात होत्या, असा आरोप भाजप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

Story img Loader