दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल आगामी गुजरात निवडणुकीसाठी जोरदार प्रचार करत आहे. त्यांच्या या प्रचारामुळे गुजरातमध्ये भाजपाला ‘आप’चे आव्हान निर्माण झाले आहे. अशातच भाजपा कार्यकर्त्यांबाबत केजरीवाल यांनी मोठा दावा केला आहे. “गुजरातमधील भाजपा कार्यकर्ते छुप्या पद्धतीने आम आदमी पक्षाला समर्थन देत आहेत. आगामी निवडणुकीत त्यांना स्वपक्षाचाच पराभव पाहायचा आहे”, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
आम आदमी पार्टी छोट्या ‘कान्हा’ सारखी आहे, दहा वर्षांपासून राक्षसांना मारत आहे – अरविंद केजरीवाल
“अनेक भाजपा नेते आणि कार्यकर्ते मला भेटतात आणि भाजपाचा पराभव करण्यासाठी छुप्या पद्धतीने सांगतात. ज्या भाजपा कार्यकर्त्यांना स्वपक्षाचा पराभव करायचा आहे, त्यांनी ‘आप’साठी काम करावे”, असे आवाहन गुजरातच्या वलसाडमधील एका सभेत केजरीवाल यांनी केले आहे. गुजरातमधील अनेक शहरांमध्ये लावण्यात आलेल्या फलकांमध्ये केजरीवाल यांना हिंदू विरोधी दर्शवण्यात आले आहे. यावरुन केजरीवाल यांनी भाजपाला लक्ष्य केले आहे. हे फलकं लावणारे राक्षस आणि कंसाचे वंशज असल्याची टीका केजरीवाल यांनी केली आहे.
“भाजपाचा २७ वर्षांचा अहंकार आपल्याला मोडायचा आहे. तुम्हाला तुमचे व्यवसाय आहेत. तुम्ही आमच्या पक्षात आल्यास तुमच्या व्यवसायाचे नुकसान केले जाईल. त्यामुळे तुम्ही त्याच पक्षात राहून त्यांच्या पराभवासाठी गोपनीयरित्या काम करा. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना घाबरण्याची गरज नाही. तुम्ही तो पक्ष सोडून ‘आप’मध्ये सामील होऊ शकता”, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. राक्षसांचा अंत करण्यासाठी आपला पाठिंबा द्या, असे आवाहन केजरीवाल यांनी वलसाडमधील सभेत केले आहे. सर्वांनी नव्या गुजरातसाठी एकत्र आलं पाहिजे. पक्षाची चिंता करू नका. देशासाठी, राज्यासाठी काम करा, असे केजरीवाल या सभेत सर्वपक्षियांना उद्देशून म्हणाले आहेत.