पश्चिम बंगालमध्ये भाजपाने तृणमूल काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा धारण केला आहे. भाजपाकडून ‘चलो नबन्ना’ मोर्चाच्या माध्यमातून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला जातोय. याच नबन्ना मोर्चात सहभागी होण्यासाठी पश्चिम बंगालमधील भाजपाचे कार्यकर्ते कोलकात्याच्या दिशेने जात आहेत. मात्र येथील राणीगंज रेल्वे स्थानक परिसरात पोलीस आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी पोलिसांनी काही भाजपाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. भाजपाच्या चलो नबन्ना मोर्चाला पोलिसांनी परावनगी नाकारलेली आहे.
हेही वाचा >>> Covid-19: ऑक्सिजन तुटवड्याकडे सरकारने दुर्लक्ष केलं, मृतांची मोजणी करून भरपाई द्या; मोदी सरकारवर संसदीय समितीचे ताशेरे
मिळालेल्या माहितीनुसार भाजपाने पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकार आणि भ्रष्टाचाराविरोधात ‘नबन्ना चलो मोर्चा’चे आयोजन केले आहे. त्यासाठी राज्यातील भाजपा कार्यकर्त्यांना मंगळवारी (१३ सप्टेंबर) कोलकात्यात येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी राज्यातील भाजपाचे कार्यकर्ते हातात भाजपाचा झेंडा घेऊन कोलकात्याच्या दिशेने निघाले आहेत. मात्र मोर्चाला परवानगी नसल्यामुळे कार्यकर्त्यांना ठिकठिकाणी अडवले जात आहे. याच कारणामुळे राणीगंज रेल्वे स्थानक परिसरात पोलीस आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कोलकात्याला जाण्यापासून रोखले. मात्र भाजपाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
हेही वाचा >>> आंबेडकर जयंतीला संचलनाची परवानगी द्या; RSS ची मद्रास उच्च न्यायालयात याचिका
दरम्यान, परवानगी नाकारलेली असूनही भाजपाचे कार्यकर्ते कोलकात्यात जमा होत आहेत. यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष एस मजुमदार यांनी अधिक प्रतिक्रिया दिली आहे. येथील जनता चोरांकडून आंदोलन करण्याची परवानगी घेणार नाही. पोलीस तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते असल्यासारखा व्यवहार करत आहेत. मागील वेळी नबन्ना मोर्चादरम्यान कलम १४४ लागू करण्यात आले होते. मात्र पश्चिम बंगालला वाचवण्यासाठी आमची ही लढाई सुरुच राहील, असे मजुमदार म्हणाले.