दिल्लीच्या शेजारी असलेल्या आणि उत्तर प्रदेशचा जिल्हा असलेल्या गाझियाबादमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. भाजपाचा युवा नेता संयम कोहली याच्या रेस्टॉरंटवर बेकायदेशीर पद्धतीने मद्य विकले जात होते. तसेच विनापरवानगी विदेशी मुलींना नाचविण्यात येत होते. याची कुणकुण पोलिसांना लागताच किवनगर पोलिस स्थानकाने छापा टाकून रेस्टॉरंटचे हे उद्योग बंद केले आहेत. गाझियाबाद पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाने एकत्रितपणे ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे हे रेस्टॉरंट गाझियाबाद जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा उत्पादन शुल्क विभागाच्या अगदी जवळ आहे. तासा किचन नामक या रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना मद्य पुरविले जात होते. तसेच नाचगाण्याचा गोरखधंदा चालत होता.
उत्तर प्रदेशमधील माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार, या रेस्टॉरंटमध्ये परदेशी मुलींना विशेषता रशियन मुलींना नाचगाणे सादर करण्यासाठी भाग पाडले जात होते. जेवणासाठी एक दाम्पत्य या रेस्टॉरंटमध्ये आले असता त्यांनी मद्य पुरविण्याचे आणि डान्सचे व्हिडिओ काढले. त्यानंतर स्थानिक पोलिसांना ते व्हिडिओ दाखवून कारवाई करण्याची मागणी केली.
या रेस्टॉरंटचा चालक हा भाजपाचा पदाधिकारी होता. गाझियाबाद जिल्हा संघटनेत भाजपा युवा मोर्चाच्या कोषाध्यक्षपदी तो काम करत होता. उत्तर प्रदेश आणि जिल्ह्यातील अनेक भाजपा नेत्यांसोबत त्याचे छायाचित्र देखील मिळाले आहे. त्याचे प्रताप समोर आल्यानंतर जिल्हा संघटनेने त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या रेस्टॉरंटमध्ये फक्त जेवणाचे बिल ग्राहकांना दिले जायचे. मद्य पुरविण्याचा कोणताही दस्तऐवज बनू नये, म्हणून मद्याचे बिल दिले जात नव्हते. ते पैसे ग्राहकांना रोकड स्वरुपात द्यावे लागायचे. तसेच याठिकाणी विनापरवाना नाचगाणं सुरु होतं. परदेशी बारबालांना आणून नाचविले जात होते. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून पुढील तपास सुरु आहे.