देशातल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यापैकी चार राज्यांमध्ये भाजपाने मोठी मुसंडी मारली आहे. भाजपाने त्यांच्या ताब्यात असलेल्या मध्य प्रदेशमधील सत्ता कायम ठेवली आहे. तर राजस्थान आणि छत्तीसगड ही दोन राज्ये काँग्रेसकडून हिसकावली आहेत. तर तेलंगणा हे राज्य काँग्रेसने बीआरएसकडून आपल्या ताब्यात घेतलं आहे. यासह मिझोरम विधानसभा निवडणुकीचा निकालही जाहीर झाला आहे. झोरम पिपल्स मूव्हमेंटने मिझोरममध्ये सत्ता मिळवली आहे. निवडणुकीच्या आधी अनेक राजकीय विश्लेषक आणि रणनीतिकारांना वाटत होतं की, या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दबदबा असेल. भाजपाच्या गोटातही चिंतेचं वातवरण होतं. त्यामुळेच भाजपाने राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये अनेक विद्यमान खासदारांना विधानसभा निवडणूक लढण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे २१ विद्यमान खासदार विधानसभा निवडणूक लढले.
तीन राज्यांमध्ये बहुमत मिळाल्यानंतर आता भाजपाकडून सरकार स्थापनेची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी चर्चा आणि बैठकांचं सत्र सुरू झालं आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या खासदारांचं पुढे काय होणार असा प्रश्न भाजपा कार्यकर्त्यांना पडला आहे. भाजपाने चार राज्यांमध्ये २१ खासदारांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं होतं. यापैकी केवळ १२ खासदार निवडणूक जिंकले आहेत, तर ९ जणांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. संसदेच्या नियमानुसार या १२ उमेदवारांना पुढच्या १४ दिवसांत निर्णय घ्यावा लागेल की त्यांना खासदार राहायचं आहे की, आमदार बनून विधानसभेत काम करायचं आहे. दरम्यान, अशी माहिती मिळाली आहे की, भाजपाचे राजस्थान विधानसभा निवडणूक जिंकलेले सर्व चार खासदार लोकसभेचा राजीनामा देणार आहेत. यापैकी काही जणांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार आहे. भाजपाने राजस्थानमध्ये कुठल्याही केंद्रीय मंत्र्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं नव्हतं. भाजपाने मध्य प्रदेशात खासदारांसह केंद्रीय मंत्र्यांना विधानसभेची निवडणूक लढण्याचे आदेश दिले होते.
भाजपाने राजस्थान आणि मध्य प्रदेशात प्रत्येकी सात, छत्तीसगडमध्ये चार आणि तेलंगणातल्या तीन खासदारांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं होतं. मध्य प्रदेशात केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय मंत्री प्रह्लाद पटेल, फग्गनसिंह कुलस्ते, खासदार राकेश सिंह, खासदार गणेश सिंह, खासदार रिती पाठक आणि खासदार राव उदय प्रताप सिंह यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. यापैकी तोमर, पटेल, राकेश सिंह, रिती पाठक आणि राव उदय प्रताप सिंह हे विधानसभा निवडणुकीत जिंकले आहेत. तर कुलस्ते आणि गणेश सिंह पराभूत झाले आहेत.
राजस्थानमध्ये राज्यवर्धनसिंह राठोड, दीया कुमार, बाबा बालकनाथ, देवजी पटेल, नरेंद्र कुमार आणि भागीरथ चौथरी यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं होतं. तसेच राज्यसभा खासदार किरोडीलाल मीना यांनाही विधानसभा लढवायला सांगितली होती. यापैकी केवळ राठोड, दीया कुमारी, बाबा बालकनाथ आणि किरोडीलाल ही विधानसभा निवडणूक जिंकले. तर देवजी पटेल, नरेंद्र कुमार आणि भागीरथ चौधरी पराभूत झाले.
छत्तीसगडमधील एक तर तेलंगणातले तिन्ही खासदार पराभूत
भाजपाने छत्तीसगडमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रेणुका सिंह, गोमती साय, अरुण साव आणि विजय बघेल यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं होतं. यापैकी बघेल हे या निवडणुकीत पराभूत झाले. तर तेलंगणात बंडी संजय, अरविंद धर्मपुरी, स्वयं बापूराव यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं होते. हे तिन्ही नेते या निवडणुकीत पराभूत झाले आहेत.
हे ही वाचा >> प्रशांत किशोर यांनी सांगितली भाजपाच्या विजयाची चार कारणं, काँग्रेसला सल्ला देत म्हणाले…
पराभूत खासदारांचं पुढे काय होणार?
विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या खासदारांमध्ये केंद्रीय मंत्री फग्गनसिंह कुलस्ते यांचाही समावेश आहे. या सर्वांचं लोकसभेचं सदस्यत्व कायम रहील. परंतु, पुढच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा तिकीट मिळेल की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. कारण एका खासदाराच्या मतदारसंघात पाच ते सात आमदार असतात. जो नेता विधानसभा निवडणुकीत पराभूत झाला आहे तो पुन्हा खासदार होईल की नाही याबाबत शंका व्यक्त केली जाऊ शकते आणि या नेत्यांचं लोकसभेचं तिकीट कापलं जाऊ शकतं.