BJP Saugat e Modi: भारतीय जनता पक्षाच्यावतीने ईदनिमित्त गरीब मुस्लिमांना एक मोठी भेट देणार आहे. देशभरातील जवळपास ३२ लाख मुस्लिम कुटुंबांना भाजपाच्या अल्पसंख्याक मोर्चाच्यावतीने ‘सौगत-ए-मोदी’ या किट्स वाटण्यात येणार आहेत. भाजपाच्यावतीने या उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. हा उपक्रम भाजपा अल्पसंख्याक मोर्चाच्यावतीने करण्यात येणार आहे. भाजपाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे ३२ हजार पदाधिकारी या उपक्रमात सहभागी होऊन देशातील जवळपास ३ हजार मशि‍दींमध्ये जाणार आहेत.

या अभियानाच्या मागचा हेतू गरीब मुस्लिमांना देखील ईद चांगली साजरी करता यावी, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे. या ‘सौगात-ए-मोदी’ किट्समध्ये अत्यावश्यक गोष्टींचा समावेश आहे. ज्याचा वापर करून गरीब मुस्लिम आपली ईद साजरी करता येईल. या संदर्भातील माहिती भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी एएनआयशी बोलताना यांनी दिली आहे.

जमाल सिद्दीकी यांनी म्हटलं की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक सणाच्या उत्सवात आणि सर्वांच्या आनंदात सहभागी होतात. आता ईदनिमित्त गरीब मुस्लिमांना ही भेट देण्यात येणार आहे. ‘सौगत-ए-मोदी’ या मोहिमेचा देशभरातील ३२ लाख वंचित मुस्लिमांना फायदा होणार आहे. ज्यांना ईद साजरी करण्यासाठी विशेष किट या उपक्रमाच्या माध्यमातून दिल्या जातील”, असं त्यांनी म्हटलं.

दरम्यान, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीतील निजामुद्दीन येथून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या ‘सौगत-ए-मोदी’ किटमध्ये खाद्यपदार्थांचा समावेश आहे. तसेच कपडे, शेवया, खजूर, सुका मेवा आणि साखर अशा गोष्टींचा समावेश आहे. तसेच महिलांच्या किटमध्ये सूटसाठी कापड असेल, तर पुरुषांच्या किटमध्ये कुर्ता-पायजमा असेल.