Chhattisgarh : छत्तीसगडमधील बिलासपूर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर पूजा विधानी यांनी नुकतीच आपल्या पदाची शपथ घेतली. मात्र, महापौर पदाची शपथ घेत असताना पूजा विधानी यांनी एक मोठी चूक केली. महापौर पदाची शपथ घेताना झालेली चूक लक्षात येताच त्यांनी सुधारण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही त्यांना पुन्हा शपथ घ्यावी लागली. मात्र, पूजा विधानी यांनी शपथ घेताना म्हटलेल्या एका शब्दांवरून विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. तसेच त्यांचा शपथ घेतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिलासपूर महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या शपथविधी सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अरुण साओ आणि केंद्रीय राज्यमंत्री तोखान साहू यांची देखील उपस्थिती होती. हा शपथविधी सोहळा बिलासपूरमधील मुंगेली नाका मैदानावर पार पडला. यावेळी पूजा विधानी यांनी महापौर पदाची शपथ हिंदीत घेतली. शपथ घेत असताना पूजा विधानी यांनी चुकून ‘संप्रभुता’ या शब्दाच्या ऐवजी ‘सांप्रदायिकता’ असं म्हटलं, म्हणजेच सार्वभौमत्व या शब्दाऐवजी पूजा विधानी यांनी’जातीयवाद’ असं म्हटलं. त्यांच्या या विधानामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

नेमकं काय घडलं?

बिलासपूरच्या नवनिर्वाचित महापौर आणि बिलासपूर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा शपथविधी सोहळा पार पडला. पण भाजपा नेत्या तथा नवनिर्वाचित महापौर पूजा विधानी यांनी शपथ घेताना एक चूक केली. त्यांनी शपथ घेताना म्हटलं की, “मैं भारत की संप्रदायिकता तथा अखंडता अक्षुन्न राखुंगी (मी भारताची जातीयवाद आणि अखंडता अबाधित ठेवीन)”, असं वाक्य त्यांनी म्हटलं. पण त्यांचं हे वाक्य लगेचच व्यासपीठावरील मान्यवरांच्या हे लक्षात आलं. त्यानंतर त्यांच्या ही चूक लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तोपर्यंत पूजा विधानी यांनी आपली शपथ पूर्ण केली. यानंतर काहीवेळाने पूजा विधानी यांना पुन्हा आपल्या पदाची शपथ घ्यावी लागली.

दरम्यान, छत्तीसगडमध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुकीचा निकाल १५ फेब्रुवारीला जाहीर झाला होता. तसेच बिलासपूरमध्ये पूजा विधानी यांनी काँग्रेसच्या प्रमोद नायक यांचा ६६,१७९ मतांनी पराभव केला. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाने बहुतांश शहरी संस्था जिंकल्या आहेत. तसेच बिलासपूरच्या महापालिका निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे.