काँग्रेसची धोरणे गरिबांच्या हिताची आहेत तर भाजपची धोरणे श्रीमंतांसाठी आहेत अशी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. मध्य प्रदेशातील प्रचार सभांमध्ये राहुल यांचे वक्तव्य पाहता ग्रामीण मतदारांवर काँग्रेसने लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट आहे.
 सागर आणि इंदोर येथील सभांमध्ये राहुल गांधी यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली़  त्यांनी भाजपच्या ‘इंडिया शायनिंग’ अभियानाची खिल्ली उडवीत बुंदेलखंड हे या राजकारणाचे बळ ठरल्याचे म्हटले आह़े  त्याच वेळी त्यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीने आणलेल्या अन्न सुरक्षा कायदा, भूसंपादन कायदा आणि मनरेगा रोजगार हमी योजना आदींची आठवणही करून दिली़
या वेळी राहुल पक्षातील नेत्यांना गटबाजीपासून अलिप्त राहण्याचे निर्देश दिल़े  तसेच मध्य प्रदेशात येणारे शासन कोणा नेत्याचे नसून गरीब, तरुण आणि महिलांचे असेल, असे मधाचे बोट लावण्याचा प्रयत्नही त्यांनी केला़  त्यांनी बुंदेलखंड प्रांतावर या सभेत विशेष भर दिला़  शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी केंद्राकडून देण्यात आलेले आर्थिक ‘पॅकेज’मधील पैसे कुठे गेले, असा प्रश्न उपस्थित करीत त्यांनी मध्य प्रदेशातील सत्ताधारी भाजपला लक्ष्य केल़े  वातानुकूलित खोल्यांमध्ये बसणाऱ्यांसाठी भाजप धोरणे राबवते. काँग्रेसने मात्र नेहमी सामान्यांना केंद्रस्थानी मानून आपली धोरणे आखल्याचे राहुल यांनी सांगितले. भाजपचा देशाला धर्माच्या नावावर तोडण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी इंदोर येथील सभेत केला.