एक्स्प्रेस वृत्त, लखनौ : उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत राज्यातील सत्तारुढ भाजपने मोठे यश मिळविल्याचे शनिवारी मतमोजणीतून स्पष्ट झाले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, २०१७ च्या तुलनेत या वेळी भाजपने नगरपालिकांच्या निवडणुकीत दुपटीने जास्त जागा मिळविल्या आहेत. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर प्रदेशातील नगरपालिका निवडणुकांत भाजपने महापौरपदाच्या सर्व १७ जागा जिंकल्याचे शनिवारी मतमोजणीत स्पष्ट झाले. त्याचबरोबर नगरपंचायत निवडणुकांत भाजपने स्पष्ट आघाडी (५४४ जागा) घेतली आहे. नगरपालिका परिषद निवडणुकांतही (१९९ जागा) भाजप विजयपथावर आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या १७ पैकी तीन जणांची सलग दुसऱ्यांदा निवड झाली आहे. यात कानपूरमध्ये प्रमिला पांडे, मोरादाबादमध्ये विनोद अगरवाल आणि बरेलीतील उमेश गौतम यांचा समावेश. 

समाजवादी पक्षाने दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून आपले स्थान कायम राखले आहे. तर बहुजन समाज पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आहे. २०१७ मध्ये बसपने अलीगड आणि मीरतमध्ये महापौरपदी विजयी मिळविला होता. त्रुटी असलेल्या आधार कार्डामुळे अनेकांना मतदान करता आले नाही, असा आरोप बसपने केला आहे. सपचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी गोरखपूरमध्ये फेरमतमोजणीची मागणी केली आहे. 

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, भाजपने आतापर्यंत अयोध्या, बरेली, झाशी, सहारनपूर आणि वृंदावन- मथुरा येथे निर्विवाद विजय मिळविला आहे. झाशीमध्ये भाजपचे उमेदवार बिहारीलाल आर्या हे ८३ हजार मताधिक्याने महापौरपदी निवडून आले आहेत. सहारनपूरमधून अजय कुमार, अयोध्येतून गिरीशपती त्रिपाठी हे महापौरपदी निवडून आले आहेत. भाजपने बरेलीतील महापौरपद आपल्याकडे कायम ठेवले आहे. तेथे उमेश गौतम हे सलग दुसऱ्यांदा या पदावरू निवडून आले आहेत. 

नगरपालिका निवडणुकांसाठी ४ मे आणि ११ मे  असे दोन टप्प्यांत मतदान झाले होते. राज्यातील ४ कोटी ३२ लाख मतदारांपैकी ५३ टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीत १७ महापौर आणि १,४०१  नगरसेवक निवडले जात आहेत. १९ नगरसेवकांची निवड बिनविरोध झालेली आहे. २०१८ मध्ये महानगरपालिका झालेल्या शहाजहानपूरमध्ये या वेळी प्रथमच महापौर निवडला जात आहे. महापौरपदाच्या मतमोजणीत झाशीचा निकाल भाजपसाठी पहिला विजय ठरला. राज्यात वर्षभरापूर्वी विधानसभेची निवडणूक झाली होती. कानपूरमधील भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवारी प्रमिला पांडे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या लोककल्याणकारी कारभाराचा हा विजय आहे.  

सपचा आरोप

पहाडी प्रभाग क्रमांक ४६ मधील मतमोजणीत गैरप्रकार झाल्याची तक्रार समाजवादी पक्षाने केली आहे. या जागेवर भाजपचे अजित सिंह ये ४९ मतांनी विजयी घोषित करण्यात आले, पण त्याला सपचे उमेदवार अजय चौधरी यांनी आक्षेप घेतला. उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले की, सर्व १७ स्थानिक स्वराज्य संस्थांत भाजपची वाटचाल स्पष्ट विजयाकडे सुरू आहे.

आता ट्रिपल इंजिन सरकार- आदित्यनाथ

उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांत भाजपला प्रचंड यश मिळाल्याचे स्पष्ट होताच, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात तिहेरी (ट्रिपल) इंजिन सरकार आणल्याबद्दल मतदारांचे जाहीर आभार मानले आहेत. त्यांनी  स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील प्रचंड यशाबद्दल भाजप कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. राज्यातील लोक आणि भाजपच्या समर्पित कार्यकर्त्यांना त्यांनी या यशाचे श्रेय दिले. या विजयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे, मार्गदर्शनाचे आणि डबल इंजिन सरकारच्या सर्वसमावेशक धोरणांचे यश प्रतिबिंबीत होते, असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjps victory in uttar pradesh mayoral victory in all 17 municipalities ysh
Show comments