Who is Vijender Gupta: काव्यात्मक न्याय काय असतो? याची प्रचिती आज दिल्ली सरकारच्या शपथविधीदरम्यान दिसून आली. मागच्या दहा वर्षात कमी आमदार असतानाही भाजपाने विधानसभा सभागृहात विरोधकांची भूमिका चोखपणे वठवली. भाजपाचे आमदार विजेंद्र गुप्ता हे २०१५ आणि २०२० साली अरविंद केजरीवाल यांची हवा असतानाही निवडून आले होते. ‘आप’ सरकारचा विरोध करत असताना त्यांना अनेकदा कारवाईस सामोरे जावे लागले होते. एकदा तर मार्शलनी त्यांना उचलून सभागृहाबाहेर काढले होते. तेच विजेंद्र गुप्ता आता दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष झाले आहेत. ज्या सभागृहातून त्यांना उचलून बाहेर काढले गेले, त्याच ठिकाणी आता त्यांच्या नेतृत्वाखाली सभागृह चालणार आहे.

योगायोगाने माजी अध्यक्ष रामनिवास गोएल आणि अरविंद केजरीवाल आता सभागृहाचे भाग नाहीत. विजेंद्र गुप्ता २०१५ आणि २०२० मध्ये अरविंद केजरीवाल यांची लाट असूनही जिंकून आले होते. २०१५ साली ‘आप’चे ७० पैकी ६७ आमदार निवडून आले होते, तर भाजपाचे केवळ तीन आमदार जिंकले होते. तरीही गुप्ता यांनी विरोधकांची भूमिका बजावत असताना जनसामान्यांचे प्रश्न मांडले होते.

मार्शलनी उचलून बाहेर काढले

२०१७ साली तत्कालीन विरोधी पक्षनेता विजेंद्र गुप्ता यांनी कथित जमीन घोटाळ्याचे कागपत्र सभागृहात दाखवून त्यावर चर्चेची मागणी केली. मात्र विधानसभा अध्यक्षांनी त्यांची मागणी फेटाळून लावली. भाजपाने मांडलेला स्थगन प्रस्तावही फेटाळण्यात आला. यानंतर वारंवार बोलत असलेल्या गुप्ता यांचा माईकही बंद करण्यात आला. तरीही गुप्ता शांत बसत नसल्यामुळे अध्यक्षांनी मार्शल बोलावून त्यांना बाहेर काढले. मार्शल गुप्ता यांना उचलून बाहेर घेऊन जातानाचे फोटो आणि व्हिडीओ त्यावेळी माध्यमात चांगलेच गाजले होते.

विजेंद्र गुप्ता कोण आहेत?

गुप्ता बनिया समाजातून येतात. सलग तिसऱ्यांदा ते रोहिणी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. आम आदमी पक्षाच्या प्रदीप मित्तल यांचा ३७,००० मतांनी त्यांनी पराभव केला. गुप्ता यांनी दिल्ली विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद आणि दिल्ली भाजपाचे अध्यक्षपदही भुषविलेले आहे. गुप्ता यांनी १९८० साली जनता विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. तर १९९५ साली ते भाजपाचे युवक संघटनेचे अध्यक्ष झाले. १९९७ साली ते दिल्ली महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले.

Story img Loader