Attack on Pakistani Army Convoy: : पाकिस्तानमधील बलुचिस्तानमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर मोठा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नोशकी जिल्ह्यात पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्याला लक्ष्य करण्यात आलं आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. आज (१६ मार्च) क्वेट्टावरून तफ्तानकडे जाणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात किमान ७ पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून २१ जण जखमी झाल्याची माहिती सांगितली जात आहे. अधिकृत सूत्रांनी ७ जणांच्या मृत्यूची पुष्टी केल्याचं वृत्त समोर येत आहे.
बलुच लिबरेशन आर्मीने (बीएलए) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तसेच या हल्ल्यात ९० पाकिस्तानी जवानांचा मृत्यू झाल्याचा दावा बलुच लिबरेशन आर्मीने केला आहे. एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, “क्वेट्टाहून तफ्तानला जाणाऱ्या सुरक्षा दलांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात ७ बस आणि दोन वाहनांचा समावेश असलेल्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. एका बसला आयईडीने भरलेल्या वाहनाने धडक दिली, कदाचित हा आत्मघातकी हल्ला होता, तर दुसऱ्या बसला रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड्स (आरपीजी) ने लक्ष्य केलं”, असं म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
दरम्यान, हा हल्ला झाल्यानंतर जखमींना नेण्यासाठी आर्मी एव्हिएशनचे हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत. तसेच परिसराची देखरेख करण्यासाठी ड्रोनची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. वृत्तानुसार, आयईडीने भरलेलं एक वाहन लष्करी बसपैकी एका बसला धडकलं, त्यामुळे हा मोठा आत्मघातकी हल्ला असल्याचं सांगितलं जात आहे.
घटनास्थळावरून गोळा केलेल्या पुराव्यांवरून असं दिसून येत आहे की आत्मघातकी हल्लेखोरांनी स्फोटकांनी भरलेलं वाहन जाणूनबुजून लष्करी ताफ्याला धडकवलं. या हल्ल्यातील मृतांचा आकडा वाढू शकतो. तसेच या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.
बलुच लिबरेशन आर्मीने काय दावा केला?
बलुच लिबरेशन आर्मीने ९० पाकिस्तानी सैनिकांना ठार केल्याचा दावा केला आहे. यासंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. यामध्ये म्हटलं आहे की, “काही तासांपूर्वी नोशकी येथील आरसीडी महामार्गावरील रख्शान मिलजवळ व्हीबीआयईडी फिदाई हल्ल्यात बलुच लिबरेशन आर्मीची युनिट, माजिद ब्रिगेडने कब्जा करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्याला लक्ष्य केलं होतं. या ताफ्यात आठ बस होत्या, त्यापैकी एक स्फोटात पूर्णपणे नष्ट झाली आहे”, असं बीएलएने निवेदनात म्हटलं असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.