रशियाच्या अपघातग्रस्त विमानाचे दोन्ही ब्लॅक बॉक्स सापडले असून अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी रशियन पथक कैरोत दाखल झाले आहे.

विमान पाडल्याचा दावा आयसिसने केला असला तरी अजून त्याची खातरजमा झालेली नाही. पर्वतीय भागात हे विमान ३१ हजार फूट उंचीवरून कोसळले. सिनाई प्रांतातील आयसिसशी संबंधित गटाने विमान पाडल्याचा दावा केला आहे. सीरियात रशियाने जे हल्ले केले त्याचा सूड उगवण्यासाठी आम्ही हे कृत्य केले असे या गटाचे म्हणणे आहे.

इजिप्तचे पंतप्रधान शेरीफ इस्माईल यांनी शनिवारी वार्ताहर परिषदेत सांगितले की, या विमान अपघातामागे काही घातपात असल्याचे वाटत नाही पण पुढील चौकशीपर्यंत ठामपणे असे काही सांगता येणार नाही.

आतापर्यंत १६३ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ते कैरोतील विविध रुग्णालयांच्या शवागारात पाठवण्यात आले आहे. रविवारीही शोधकार्य सुरू होते. रशियाचे तज्ज्ञ घटनास्थळी गेले असून त्यांनी अपघातांच्या कारणांची चौकशी सुरू केली आहे.

रशिया हा सीरियाचा मित्रदेश असून रशियाने सीरियात इस्लामिक स्टेटवर हल्ले केले आहेत. इराक व सीरियात बराच भाग इस्लामिक स्टेटच्या ताब्यात आहे. अपघातात मरण पावलेल्यात २१४ रशियन तर तीन युक्रेनियन होते. सिनाईत इस्लामिक स्टेटने इजिप्तच्या अनेक सैनिकांना ठार केले आहे.

Story img Loader