उत्तर प्रदेशची राजधानी असणाऱ्या लखनऊमध्ये एकाच रुग्णाला तीन प्रकारच्या बुरशीचा संसर्ग झाल्याचं विचित्र प्रकरण समोर आलं आहे. म्हणजेच व्हाइट फंगस, ब्लॅक फंगस आणि यल्लो फंगस अशा तिन्ही प्रकारच्या बुरशींचा एकाच वेळी संसर्ग झालेल्या रुग्णावर तीन तास शस्त्रक्रीया करण्यात आली. शस्त्रक्रीयेनंतर या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. मिळालेल्या माहितीनुसार फैजाबाद येथे राहणाऱ्या सरस्वती यादव यांना महिन्याभरापूर्वी करोनाचा संसर्ग झाला होता. त्यांनी करोनावर मात केली आणि त्या घरी परतल्या. मात्र नंतर त्यांना चेहऱ्याजवळ वेदना होत असल्याने त्यांनी लखनऊमधील राजधानी रुग्णालयामध्ये धाव घेतली. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर या महिलेला फंगसचा संसर्ग झाल्याचं समोर आलं.

डॉक्टरांनी इतरही चाचण्या केल्या आणि त्यामध्ये समोर आलेल्या निकालांमधून या महिलेला एकाच वेळी तिन्ही प्रकारच्या बुरशीचा संसर्ग झाल्याचं उघड झालं. त्यानंतर डॉक्टरांनी गोळ्या औषधांच्या माध्यमातून उपचार सुरु केले. मात्र त्याला अल्प प्रतिसाद मिळत असल्याने शस्त्रक्रीया करुन चेहऱ्याचा काही भाग काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. तीन तास चाललेल्या शस्त्रक्रीयेनंतर या महिलेचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. करोनावर मात मिळवल्यानंतर एकाच रुग्णाला तिन्ही प्रकारच्या बुरशीचा संसर्ग होण्याचं हे पहिलच प्रकरण आहे. देशामध्ये अशाप्रकारे एकाच व्यक्तीला तिन्ही प्रकारच्या बुरशीची लागण झाल्याचं हे दुसरं प्रकरण आहे. यापूर्वी गाझियाबादमधील एका रुग्णाला तिन्ही प्रकारच्या बुरशीचा संसर्ग झाला होता. मात्र या रुग्णाला आधी करोना झालेला नव्हता.

नक्की वाचा >> धक्कादायक! आयसोलेशनला कंटाळलेल्या करोना पॉझिटिव्ह सासूने सुनेला मिठी मारुन केलं बाधित

राजधानी रुग्णालयातील डोकं आणि मानेची शस्त्रक्रीया करणाऱ्या विभागातील डॉक्टर अनुराग यांनी आजतकला दिलेल्या माहितीनुसार, फैजाबादमधील या महिलेला पोस्ट कोव्हिड लक्षणं दिसून येत होती. चेहरावरील स्नायू दुखत असल्याची तक्रार त्यांनी केल्यानंतर त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर या महिलेलेला तिन्ही प्रकारच्या बुरशीची लागण झाल्याचं समोर आलं. करोना संसर्गाची लाट आलेली असतानाच देशामध्ये ब्लॅक फंगसच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. म्युकरमाइकोसिस नावाने ओळखला जाणारा ब्लॅक फंगस सामान्यपणे अशा रुग्णांमध्ये दिसून येतो ज्यांना करोना उपचारादरम्यान मोठ्या प्रमाणात स्टेरॉइड देण्यात येतात किंवा जे खूप काळ रुग्णालयामध्ये दाखल असतात.

Story img Loader