‘अ‍ॅपल’कडे नाविन्याचा दुष्काळ असून, ‘आयफोन’मध्ये वापरण्यात येत असलेले ग्राहकोपयोगी सॉफ्टवेअर पाच वर्षे जुने असल्याची टीका “ब्लॅकबेरी’चे प्रमुख थॉर्टन हेन्स यांनी केलीये. ऑस्ट्रेलियामध्ये दिलेल्या एका मुलाखतीत हेन्स यांनी ‘अ‍ॅपल’च्या उत्पादनाचे चिकीत्सक विश्लेषण केले. 
‘अ‍ॅपल’ने सर्वांत पहिल्यांदा २००७ मध्ये सादर केलेला आयफोन हा त्यावेळी सर्वोत्कृष्ट हॅण्डसेट होता. मात्र, नाविन्याच्या अभावामुळे कंपनीची सध्याची अवस्था दयनीय झाली असल्याचे हेन्स यांचे म्हणणे आहे. टचस्क्रिन, ग्राहकोपयोगी सॉफ्टवेअर आणि त्यातील आयकॉन्सचे डिझाईन ही अ‍ॅपलची बलस्थाने होती. मात्र, मोबाईल उत्पादनांच्या बाजारात नाविन्याचा, बदलांचा वेग तीव्र आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या उत्पादनांमध्ये सातत्याने सुधारणा केल्या नाहीत, तर तुम्ही बाजारातून फेकले जाऊ शकता, असे हेन्स यांचे मत आहे.
ब्लॅकबेरीचा नवा हॅण्डसेट ऑस्ट्रेलियामध्ये सादर करण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर हेन्स यांनी ‘अ‍ॅपल’वर टीका केली. आयफोनपेक्षा ब्लॅकबेरीच्या नव्या हॅण्डसेटमध्ये असलेले मल्टि-टास्किंग फिचर उत्कृष्ट आहे. त्यामध्ये एखाद्या लॅपटॉपप्रमाणे एकाचवेळी विविध अ‍ॅप्स वापरता येतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.