Bengaluru Techie Suicide: बंगळुरुमध्ये डिसेंबर महिन्यात अतुल सुभाष आत्महत्या प्रकरण घडले होते. या प्रकरणामुळे संबंध देशात हळहळ व्यक्त करण्यात आली होती. बंगळुरुमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणीनेही आत्महत्या केल्याची बातमी समोर येत आहे. काका-काकीच खासगी फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन या तरुणीचा छळ करत होते. खासगी फोटो तरुणीच्या आई-वडिलांना पाठविण्याची धमकी देऊन आरोपी काकाने मुलीला एका हॉटेलमध्ये बोलावलं होते. तिथे गेल्यानंतर तरुणीनं स्वतःला पेटवून घेतलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमुख आरोपी असलेल्या काकाला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. कुंदलाहळ्ळी मेट्रो स्थानकानजीक असलेल्या एका हॉटेलमध्ये सदर तरुणीला तिच्या काकांनीच बोलावलं होतं. तरुणीला तिथं जायचं नव्हतं, मात्र काकांच्या धमकीमुळं तिला तिथं नाईलाजानं जावं लागलं.

बंगळुरुतील व्हाईटफिल्ड उपनगराचे पोलीस उपायुक्त शिवकुमार गुनर यांनी सांगितले की, हॉटेलमध्ये जाण्यास तरुणीनं नकार दिला होता. मात्र तिच्या काकांनी तरुणीचे खासगी फोटो आणि व्हिडीओ तिच्या पालकांना पाठविणार असल्याची धमकी दिली. यानंतर तरुणी स्वतःसह पेट्रोल घेऊन सदर हॉटेलरुममध्ये गेली आणि तिथे काकांसमोरच तिनं स्वतःला पेटवून घेतलं. जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तिथे तिचा मृत्यू झाला.

मृत तरुणीच्या आईनं पोलिसांना सांगितलं की, मागच्या सहा वर्षांपासून ती काका-काकींच्या घरी राहत होती. ती अनेकदा त्यांच्यासह बाहेर फिरायलाही गेलेली होती. पोलिसांनी काकाकडून एक पेनड्राईव्ह जप्त केला आहे. तसेच आरोपी काका आणि काकूवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीकडून अपघाताचा बनाव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीनं स्वतःला पेटवून घेतल्यानंतर आरोपीनं हा अपघात असल्याचा बनाव केला. मात्र तरुणी ६० टक्क्यांहून अधिक भाजल्यामुळं आणि आरोपीचे हातही जळाल्याचे पाहून त्याचा बनवा फार काळ टिकला नाही.

Story img Loader