‘परदेशी बँकांत पैसे दडवून ठेवणाऱ्या काळा पैसाधारकांची नावे जाहीर केली, तर काँग्रेसची लाज निघेल,’ असे वक्तव्य करणारे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर काँग्रेसने बुधवारी जोरदार हल्लाबोल केला. जेटली यांनी काळय़ा पैशाच्या मुद्दय़ावरून आम्हाला ‘ब्लॅकमेल’ करण्याऐवजी सर्व काळा पैसाधारकांची नावे जाहीर करावीत, असे आव्हान काँग्रेसने जेटलींना दिले आहे.
काळा पैसाधारकांची नावे जाहीर करणे शक्य नसल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केल्यापासून या मुद्यावर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र, ‘नावे जाहीर केली तर काँग्रेसच अडचणीत येईल’ असे सूचक विधान जेटली यांनी मंगळवारी केले होते. त्याला काँग्रेसने बुधवारी प्रत्युत्तर दिले. ‘काँग्रेसला अशा धमक्यांची भीती नाही. आम्हाला कसलीही भीती दाखवू नका. काळय़ा पैशाच्या मुद्दय़ावर कठोर कृती होण्याची गरज आहे. मात्र, त्यामध्ये सूडबुद्धी किंवा अर्धसत्य असता कामा नये,’ असे पक्षाचे सरचिटणीस अजय माकन म्हणाले. भाजपचे केंद्रात सरकार आहे. त्यामुळे त्यांनी ही नावे उघड करून त्या व्यक्तींवर कारवाई करावी. मात्र, ही कारवाई केवळ १३६ व्यक्तींपुरती मर्यादित नसावी. ही कारवाई करताना, केंद्र सरकारने पक्षपात दाखवू नये, असेही ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीतील प्रचाराचा मुख्य मुद्दा बनलेल्या काळय़ा पैशावरून काँग्रेस व भाजपमध्ये नव्याने शब्दयुद्ध सुरू झाले आहे. एकीकडे, काँग्रेसकडून भाजपवर हल्लाबोल होत असताना, बुधवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना जेटली यांनी काळा पैसाधारकांत आधीच्या यूपीए सरकारमधील मंत्र्याचाही समावेश असण्याचे संकेत दिले. याबद्दल विचारले असता, ‘मी याचा इन्कार करणार नाही वा होकारही देणार नाही. मी केवळ स्मित करतोय’ असे सूचक उत्तर जेटली यांनी दिले. त्यामुळे या वादाला आणखी खतपाणी मिळाले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘काळा पैसा भारतात परत आणला, तर प्रत्येक नागरिकाला १५ लाख रुपये मिळतील,’ असे गणित मांडले होते. तर पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी ‘केंद्रात सत्ता आल्यास १०० दिवसांत काळा पैसा भारतात परत आणू’ असे आश्वासन दिले होते. त्यामुळे या मुद्दय़ावर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे.