उत्तराखंडमधील भीषण जीवितहानी आणि वित्तहानीसंबंधी आता आरोप-प्रत्यारोप होण्यास सुरुवात झाली असून संभाव्य संकटाबद्दल पुरेशा वेळेत सावध करण्यात आल्याचा दावा हवामान खात्याकडून रविवारी करण्यात आला तर एवढी मोठी हानी होऊ शकेल याची पूर्वसूचना मिळण्यासंबंधी पुरेसे संकेत देण्यात आले नव्हते, असा अप्रत्यक्ष आरोप राज्य सरकारने केला आहे. दरम्यान, उत्तराखंडामधील जीवितहानीला मानवी चुकाच कारणीभूत होत्या आणि वेळेत खबरदारी घेण्यात आली असती तर एवढी मोठी हानी टळणे सहज शक्य होते, असा आरोप करून भाजपच्या नेत्या उमा भारती यांनी या आरोपबाजीत आणखी तेल ओतले आहे.
उत्तराखंडाच्या हवामान विभागाचे संचालक आनंद शर्मा यांनी आपली बाजू स्पष्ट करताना पुढील काही दिवसांत मोठय़ा पावसाची शक्यता असून बद्रीनाथ, केदारनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्रीची यात्रा चार ते पाच दिवस पुढे ढकलावी, असा सल्ला आपण १४ जून रोजीच दिला होता, याकडे लक्ष वेधले. नजीकच्या काळात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे इशारेही आम्ही १४ जूनपासूनच दिले होते, असे ते म्हणाले. १५ जून रोजीही आम्ही अति-मुसळधार पावसाचा इशारा देऊन चारधाम यात्रा पुढे ढकलण्याचा इशारा दिला होता आणि विशेषकरून उत्तराखंडासाठी हा इशारा असल्याचे आम्ही नमूद केले होते, असेही शर्मा यांनी स्पष्ट केले.
उत्तराखंडाचे आपत्तीनिवारण मंत्री यशपाल आर्य यांनी हवामान खात्याकडून इशारा देण्यात आल्याचे मान्य केले होते परंतु राज्यातील ठिकठिकाणच्या भागांत लाखो लोक अडकून पडले असल्याने त्यांच्यासाठी काही करणे थोडय़ा प्रमाणावरच शक्य असल्याचे ते म्हणाले. आम्हाला पूर्वसूचना होती परंतु या पातळीवर हानी पोहोचेल यासंबंधी आगाऊ इशारा देण्यात आला नव्हता, असे आर्य यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, उत्तराखंडमधील आपत्तीला मानवी चुकाच कारणीभूत ठरल्या आणि त्या टाळून काही पावले वेळीच उचलण्यात आली असती तर ही हानी टळली असती, असा दावा भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी रविवारी भोपाळ येथे केला. मुसळधार पावसामुळे नद्यांना येणारे पूर तुम्ही रोखू शकत नाही परंतु मानवी हानी व्हायला नको होती, असे त्यांनी नमूद केले. १४ जूनपासून उत्तराखंडात मुसळधार पाऊस पडत होता. या काळात केदारनाथच्या वर असलेले गांधी सरोवर दुथडी भरून वाहू लागले. तेव्हाच तेथे अडकलेल्या यात्रेकरूंना अन्यत्र सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी पावले उचलण्यात आली असती तर मानवी हानी टाळणे शक्य झाले असते, असे उमा भारती यांनी सांगितले.

मृतांची संख्या सांगण्यास मुख्यमंत्री बहुगुणा असमर्थ
डेहराडून  : उत्तराखंडच्या जलप्रलयातील मनुष्यहानीबाबत शेकडोपासून हजारोपर्यंत आकडे अंदाजादाखल सांगितले जात असले तरी मरण पावलेल्या किंवा वाहून गेलेल्या व्यक्तींचा नेमका आकडा कधीच समजू शकणार नाही, असे उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी मुलाखतीत सांगितले. उत्तराखंडमधील जलप्रलय ही मानवनिर्मित दुर्घटना होती हा आरोप आपल्याला मान्य नाही, दुर्घटना या आपल्या नियंत्रणातील नसतात. सुनामी, भूकंप किंवा ढगफुटी यांना आपण नियंत्रित करू शकत नाही. अशा परिस्थितीत लोकांना वाचवता कसे येईल हा एकच विचार करता येतो, असे बहुगुणा म्हणाले. दुर्घटनेची तीव्रता कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या होत्या. केदारनाथमध्ये एक तलाव भरून वाहिला, मंदाकिनीने तिचा मार्ग बदलला हे मानवनिर्मित होते काय? लडाखमधील ढगफुटी मानवनिर्मित होती काय? जपानमधील सुनामी किंवा भूकंप मानवनिर्मित होते काय ? या सर्व दुर्घटनांचा परिणाम कमी करण्यासाठी हिमालयाच्या कुशीतील सर्वच राज्यांसाठी उपाययोजना करायला हव्यात, असे ते म्हणाले.

Story img Loader