पीटीआय, चंडीगड

पंजाब भाजपचे नेते मनोरंजन कालिया यांच्या जालंधर येथील निवासस्थानी मंगळवारी काही अज्ञात व्यक्तींनी हँड ग्रेनेड फेकला. त्यामध्ये एक एसयूव्ही वाहन आणि मोटारसायकलसह काही वस्तूंचे नुकसान झाले. मात्र, कोणालाही इजा झाली नाही. हा स्फोट झाला तेव्हा कालिया घरीच होते. पंजाब पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.

पाकिस्तानची गुप्तचर संघटना ‘आयएसआय’ आणि लॉरेन्स बिष्णोई टोळीचे सदस्य यांनी पंजाबमध्ये धार्मिक तणाव वाढवण्यासाठी या हल्ल्याचा कट रचला असे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली ई-रिक्षा ताब्यात घेण्यात आली असल्याची माहिती विशेष पोलीस महासंचालक अर्पित शुक्ला यांनी पत्रकारांना सांगितले. घटना घडल्यानंतर १२ तासांच्या आत पोलिसांनी त्याचा छडा लावला असल्याचे ते म्हणाले. तसेच पाकिस्तानस्थित बब्बर खालसा इंटरनॅशनलचा सूत्रधार हरविंदर सिंह उर्फ रिंडा आणि गुंड हॅपी पसिया यांचाही या कटाशी संबंध असू शकतो अशी शक्यता शुक्ला यांनी व्यक्त केली. त्या दृष्टीने तपास सुरू असून ठिकठिकाणी छापे टाकले जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

या प्रकरणी संपूर्ण दहशतवादी जाळ्याचा माग काढण्यासाठी आणि सर्व सूत्रधारांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी पंजाब पोलीस केंद्रीय गुप्तचर यंत्रणांबरोबर समन्वयाने काम करत आहेत असे जालंधरच्या पोलीस आयुक्त धनप्रीत कौर यांनी सांगितले.