एपी, काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील शियाबहुल भागात शुक्रवारी सकाळी झालेल्या आत्मघातकी स्फोटात १९ जण ठार तर २७ जण जखमी झाले. काबूल पोलीस प्रमुखांच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली. प्रवक्ते खालिद झदरान यांनी सांगितले, की शुक्रवारी पहाटे दश्ती बर्ची भागातील एका शैक्षणिक संकुलात स्फोट झाला. या प्रदेशात अल्पसंख्याक शिया समाजाचे नागरिक राहतात. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणी स्वीकारलेली नाही.
हेही वाचा >>> ‘अग्निवीर भरती’स्थळी हल्ल्याचा कट रचणारे दोन दहशतवादी ठार
हेही वाचा >>> युक्रेनचे चार प्रदेश रशियात विलीन, पुतिन यांची करारावर स्वाक्षरी
झदरान यांनी सांगितले, की मृतांत शालेय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ‘काझ उच्च शैक्षणिक केंद्र’ असे या संकुलाचे नाव असून, येथे विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन प्रवेश परीक्षेची तयारी केली जाते. शुक्रवारीही येथे प्रवेश परीक्षेच्या तयारीच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या भागातील शैक्षणिक केंद्रांनी अशा मोठय़ा कार्यक्रमांचे आयोजन करताना तालिबान सरकारकडे अतिरिक्त सुरक्षा मागितली पाहिजे.
ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता पुन्हा घेतल्यानंतर त्यांच्या प्रमुख प्रतिस्पर्धी ‘इस्लामिक स्टेट’च्या अफगाणिस्तानमघील गटाने दश्ती बर्ची परिसरात अनेकदा हाजरा समाजाला लक्ष्य केले आहे. गृह मंत्रालयातील तालिबान नियुक्त प्रवक्ता अब्दुल नफी तकोर यांनी सांगितले, की आमच्या पथकांना घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. अफगाणिस्तानमधील अमेरिकेच्या उपराजदूत कॅरेन डेकर यांनी या हल्ल्याचा निषेध करताना नमूद केले, की परीक्षेची तयारी करणाऱ्या निष्पाप विद्यार्थ्यांनी भरलेल्या सभागृहावर हल्ला करणे लज्जास्पद आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांचा भयमुक्त व शांततापूर्ण वातावरणात शिक्षण घेण्याचा हक्क आहे. आम्ही मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकर बरे होवोत, अशी प्रार्थना.