Blast in oxygen plant, Bangladesh: बांगलादेशातील चित्तगाँगच्या सीताकुंडा उपजिला परिसरातील एका ऑक्सिजन प्रकल्पामध्ये भीषण स्फोट झाला आहे. या भयानक स्फोटात सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर ३० हून अधिकजण जखमी झाले आहेत. या ऑक्सिजन प्रकल्पात झालेला स्फोट इतका भयंकर होता की, घटनास्थळापासून दोन चौरस किलोमीटर परिसरातील अनेक इमारती हादरल्या आहेत, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.
शनिवारी दुपारी बांगलादेशच्या आग्नेय भागात ही दुर्घटना घडली. चित्तगाँगच्या आग्नेय दिशेला ४० किमी अंतरावरील सीताकुंडा येथील ऑक्सिजन प्रकल्पात हा स्फोट घडला आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून बचाव कार्य सुरू आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला, याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली.
हेही वाचा- भारतात तुर्कस्तानसारखा भूकंप आल्यावर या राज्यांना सर्वात मोठा धोका, या झोनमध्ये आहे महाराष्ट्र
स्थानिक सरकारी अधिकारी शहादत हुसेन यांनी ‘रॉयटर्स’ला सांगितलं की, “घटनास्थळावरून आतापर्यंत सहा मृतदेह बाहेर काढले आहेत.बचाव दलाचं काम अद्याप सुरूच आहे. ऑक्सिजन प्रकल्पाच्या आजुबाजुच्या इमारतीही हादरल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.