मुहर्रमनिमित्त काढलेल्या मिरवणुकीवर आत्मघातकी स्फोट घडवून आणलेल्या हल्ल्यात बुधवारी रात्री २३ जण ठार झाले तर ६८ जण जखमी झाले. रावळपिंडी शहरात ही घटना घडली. कराचीतही बुधवारी सायंकाळी अशाच एका हल्ल्यात दोन जण ठार झाले.
शिया पंथियांच्या मुहर्रम मिरवणुकीवर हल्ले करण्याच्या घटनांमध्ये अलीकडे लक्षणीय वाढ झाली आहे. बुधवारी रात्री रावळपिंडीत मिरवणूक निघाली असता एका हल्लेखोराने मिरवणुकीत जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थितांनी त्याला विरोध केला असता त्याने शरीराला लावलेल्या स्फोटकांचा स्फोट केला. या हल्ल्यात २३ जण ठार तर ६८ जण जखमी झाले. या घटनेची जबाबदारी पाकिस्तानी तालिबानी संघटनेने स्वीकारली.
दरम्यान, बुधवारी सायंकाळीच कराची शहरात शिया पंथियांचे प्राबल्य असलेल्या परिसरात बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले. त्यात दोन जण ठार तर १६ जण जखमी झाले. मुहर्रमच्या पाश्र्वभूमीवर पाकिस्तानात कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. अधिक हिंसाचार टाळण्यासाठी पाक सरकारने ही खबरदारी घेतली आहे.     

Story img Loader