पंजाबच्या लुधियाना कोर्टामध्ये भीषण स्फोट झाल्याचा धक्कादायक प्रकार दुपारच्या सुमारास घडला आहे. आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला असून त्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की त्यामुळे न्यायालयात स्फोट झालेल्या ठिकाणच्या भितींना तडे गेले, तर बाजूच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. न्यायालयाच्या दुसऱ्या मजल्यावर हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. नेमका स्फोट कशामुळे झाला, याविषयी अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र, न्यायालयाच्या आवारातच नाही, तर थेट न्यायालयाच्या इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर हा स्फोट झाल्यामुळे यावरून परिसरात खळबळ उडाली आहे.

दुपारी साडेबाराच्या सुमारास न्यायालयाच्या आवारामध्ये अचानक स्फोट झाल्याचा आवाज झाला. त्यानंतर हा स्फोट न्यायालयाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर झाल्याची बाब समोर आली. पोलिसांनी तातडीने हा परिसर बंद केला असून अग्निशमन विभागाला घटनास्थळी पाचारण करण्यात आलं.

न्यायालयाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या स्वच्छतागृहात हा स्फोट झाल्याचं सांगितलं जात आहे. “या स्फोटाचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. एक मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. ही व्यक्ती स्फोटकं घेऊन जात असल्याचा किंवा त्याच्या फार जवळ असल्याचा अंदाज आहे. घटनेमध्ये जखमी झालेल्या चार व्यक्तींची प्रकृती आता सुधारत आहे”, अशी माहिती लुधियाना पोलीस आयुक्त गुरप्रीत सिंग भुल्लर यांनी दिली.

दरम्यान, नेटिझन्सकडून सोशल मीडियावर स्फोट झालेल्या ठिकाणचे व्हिडीओ ट्वीट केले जात आहेत. लुधियाना जिल्हा कोर्टाचं हे आवार शहराच्या मध्यभागी असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या जवळच आहे. त्यामुळे या घटनेचा गांभीर्याने तपास होण्याची मागणी केली जात आहे.

या घटनेनंतर पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ट्वीट करत मृतांसाठी शोक व्यक् केला आहे.