पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादच्या सीमेवर असलेल्या गर्दीच्या फळबाजारात बुधवारी झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटात २३ जण ठार, तर १०० हून अधिक लोक जखमी झाले.
 सेक्टर १-११ मध्ये झालेल्या या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नाही. प्राथमिक माहितीनुसार ४-५ किलोचे बॉम्ब हे पेरूच्या टोपलीत ठेवण्यात आले होते. लिलावात भाग घेण्यासाठी लोक आले असता या बॉम्बचा स्फोट झाला. पाकिस्तान इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेचे कुलगुरू प्रा. जावेद अक्रम यांनी मृतांचा आकडा २३ असल्याचे सांगितले.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ३१ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. १६ जखमींना उपचारासाठी रावळपिंडीला नेण्यात आले आहे.  बॉम्बस्फोट घडला, त्या वेळी बाजारात सुमारे दोन हजार लोक आले होते.
सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले, की पोलिसांनी घटनास्थळी सुरक्षा कडे केले असून बॉम्ब निकामी करणारे पथक हे या ठिकाणी शोध घेत आहे. न्यायालयाच्या आवारातील स्फोटानंतर इस्लामाबाद येथे महिनाभराने बॉम्बस्फोटाची घटना घडली आहे.

Story img Loader