तालिबानने ऑगस्ट महिन्यात अफगाणिस्तानवर ताबा मिळवला. तेव्हापासून अफगाणिस्तानमधील परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. याच दरम्यान, आज राजधानी काबुलमधील एका मशिदीबाहेर स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. तालिबानच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, काबुलच्या मशिदीबाहेर रविवारी झालेल्या स्फोटात अनेक नागरिक ठार झाले आहेत. काबूलमधील ईद गाह मशिदीच्या प्रवेशद्वाराजवळ हा स्फोट झाला, असे प्रवक्ते झबीहुल्ला मुजाहिद यांनी ट्विटरवर सांगितले.

झबीहुल्ला मुजाहिद यांच्या आईचा गेल्या आठवड्यात मृत्यू झाला होता. त्यांच्या आईसाठी रविवारी दुपारी मशिदीत प्रार्थना सोहळा आयोजित करण्यात आला होता. मुजाहिद यांनी शनिवारी सोशल मीडियावर पोस्ट करत या प्रार्थना सोहळ्याला उपस्थित राहण्याची मित्रांना आणि नागरिकांना विनंती केली होती. “मी ईद गाह मशिदीजवळ स्फोटाचा आवाज ऐकला आणि त्यानंतर गोळीबार झाला, अशी माहिती मशिदी जवळचा दुकानदार अहमदउल्ला एएफपीला दिली. स्फोटाच्या अगदी काही वेळापूर्वी तालिबानने ईद गाह मशिदीत झबीहुल्ला मुजाहिदच्या आईसाठी प्रार्थना समारंभ आयोजित करण्यासाठी रस्ता अडवला होता, अशी माहिती समोर आली आहे.

राजधानीतील दोन ठिकाणी एएफपीच्या पत्रकारांनीही स्फोट आणि गोळीबाराचा आवाज ऐकला. तसेच जखमींना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका काबुलच्या रुग्णालयाच्या दिशेने धावताना दिसल्या.

Story img Loader