नवी दिल्लीतल्या चाणक्यपुरी परिसरात इस्रायली दूतावासाच्या मागे एका इमारतीतल्या रिकाम्या फ्लॅटमध्ये मोठा स्फोट झाला आहे. या घटनेनंतर स्पेशल सेलचं एक पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. तसेच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं आहे. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी एक तासभर आसपासच्या परिसरात तपास केला. परंतु, या तपासात पोलिसांच्या हाती असं असं काहीच लागलं नाही, ज्याद्वारे या स्फोटाबद्दलची माहिती मिळेल. दरम्यान, हा स्फोट कोणी केला, का केला याबाबत तपास चालू आहे.
स्फोट झालेल्या ठिकाणापासून काही अंतरावर पोलिसांना एक पत्र सापडलं आहे. या पत्रात इस्रायली दूतावासाच्या राजदूतांचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच या पत्रात एक झेंडादेखील गुंडाळण्यात आला होता. पोलिसांनी हे पत्र ताब्यात घेतलं असून या पत्राच्या अनुषंगानेदेखील तपास जारी आहे.
सायंकाळी सहा वाजण्याच्या आसपास दिल्ली अग्निशमन दलाला एका अज्ञात व्यक्तीने फोन केला आणि कथित स्फोटाबाबत माहिती दिली. त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचं एक पथक आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झालं. प्रकरणाचं गांभीर्य पाहता स्पेशल सेलकडून तपास चालू आहे.
इस्रायली दूतावासाच्या मागे असलेल्या एका रिकाम्या फ्लॅटमधून स्फोटाचा आवाज आला. आसपासच्या तीन-चार जणांनी हा आवाज ऐकला. हा स्फोट कसला होता याबाबत कुठल्याही प्रकारची माहिती मिळाली नाही. पोलीस सध्या तपास करत आहेत. स्पेशल सेलमधील सूत्रांच्या हवाल्याने आज तकने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
हे ही वाचा >> “हमासच्या दहशतवाद्यांनी लहान मुलांना जाळलं आणि महिलांवर…”, बेंजामिन नेतान्याहूंच्या पत्नीचं पोप फ्रान्सिस यांना पत्र
दरम्यान, इस्रायली दूतावासानेही या स्फोटाची पुष्टी केली आहे. सायंकाळी ५.१० वाजता दूतावासाच्या आसपास एक स्फोट झाला होता. दिल्ली पोलीस आणि सुरक्षा दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून ते तपास करत आहेत. दूतावासातील सर्व कर्मचारी सुखरूप असल्याचं दूतावासाने सांगितलं आहे.