बॉस्टन शहर सोमवारी दोन बॉम्बस्फोटांनी हादरले. स्फोटामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून, १४० जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळावरून दोन जिवंत बॉम्बही हस्तगत करण्यात आले असून, ते निकामी करण्यात आल्याचे अमेरिकी गुप्तचर यंत्रणेतील सूत्रांनी सांगितले.
शहरात आयोजिण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेच्या अंतिम सीमारेषेजवळ हे स्फोट घडविण्यात आले. प्राथमिक चौकशीनुसार हा दहशतवादी हल्ला असल्याची माहिती पुढे आलीये. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्या पैकी १४ जणांची स्थिती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
मॅरेथॉन सुरू असल्यामुळे अंतिम सीमारेषेजवळ लोकांची मोठी गर्दी होती. त्याचाच फायदा घेऊन हे स्फोट घडविण्यात आले. स्फोटामुळे तेथील अनेक इमारतीच्या काचा फुटल्या आहेत. हे स्फोट दहशतवादी हल्ला असल्याचे गृहीत धरून त्याच दृष्टीने तपास सुरू असल्याचे व्हाईट हाऊसमधील अधिकाऱयांनी सांगितले.
अतिशय नियोजनबद्धपणे हे स्फोट घडविण्यात आले. सुमारे शंभर मीटर अंतरावर दोन्ही बॉम्ब पेरण्यात आले होते. लागोपाठ दोन्ही स्फोट घडविण्यात आले. स्फोटानंतर परिसरात धुराचे मोठे लोट दिसू लागले होते. ११ सप्टेंबर २००१ मध्ये अमेरिकेवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा अमेरिकेला लक्ष्य करण्यात आले आहे.