श्योपूर (मध्य प्रदेश ) : लाखो मातांचे लाभलेले आशीर्वाद ही माझ्यासाठी मोठी शक्ती, ऊर्जा, प्रेरणा आणि संरक्षण असल्याची कृतज्ञ भावना व्यक्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले, की कोणत्याही क्षेत्रात महिलांचे प्रतिनिधित्व वाढले की यश आपोआपच लाभते. शनिवारी कराहल शहरातील मॉडेल स्कूल मैदानावर महिला बचत गटांच्या परिषदेत ते बोलत होते.
मोदी म्हणाले, की गेल्या शतकातील भारत आणि या शतकातील नव्या भारतातील मोठा फरक आपल्या स्त्रीशक्तीच्या प्रतिनिधित्वाच्या रूपाने दिसतो. आजच्या नव्या भारतात पंचायत भवन ते राष्ट्रपती भवनापर्यंत स्त्रीशक्तीचा झेंडा डौलाने फडकत आहे. जिथे महिलांचे प्रतिनिधित्व वाढले, त्या क्षेत्रात आपोआपच यश मिळाले आहे. ‘स्वच्छ भारत अभियान’चे यश हे याचे एक उत्तम उदाहरण आहे.
गेल्या आठ वर्षांत बचतगटांना सक्षम करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत केली. आज देशभरातील आठ कोटींहून अधिक भगिनी या मोहिमेशी जोडल्या गेल्या आहेत. प्रत्येक ग्रामीण कुटुंबातील किमान एका भगिनीने या अभियानात सहभागी व्हावे, हाच आमचा उद्देश आहे. खेडय़ातील अर्थव्यवस्थेत महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्यासाठी नवीन संधी निर्माण करण्यासाठी आमचे सरकार सातत्याने काम करीत आहे.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान