Blind couple stays with Dead Body: तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. एका अंध दाम्पत्याचा मुलगा मरण पावल्यानंतर त्याच्या पालकांना चार दिवस या घटनेचा पत्ता लागला नाही. हैदराबादच्या नागोळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सदर घटना घडली आहे. घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी घराची झडती घेतली असता समोर धक्कादायक दृश्य दिसले. के. रामण्णा (वय ६०) आणि के. शांताकुमारी (वय ६५) हे अर्ध बेशुद्ध अवस्थेत घरात पडलेले दिसून आले. त्यांच्या तोंडातून फेस येत होता.
सोमवारी (दि. २८ ऑक्टोबर) दुपारी पोलिसांना दुरध्वनीवरून नागोळेच्या कॉलनीतून फोन आला होता. नागोळे पोलीस ठाणे प्रमुख सूर्या नायक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घरात गेल्यानंतर तीन लोक दिसून आले. त्यापैकी के. प्रमोद (वय ३०) हा मृतावस्थेत आढळून आला. त्याचे शरीर कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. यानंतर पोलिसांनी अंध दाम्पत्याला घराबाहेर काढले.
पोलिसांनी सांगितले की, प्रमोदने चार दिवसांपूर्वी आई-वडिलांना जेवण भरले आणि तो झोपी गेला. त्याचा झोपेतच मृत्यू झाला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्यृचे कारण समजू शकणार आहे. मुलाचा मृत्यू झाल्यानंतर वृद्ध अंध दाम्पत्यांना चार दिवस काहीच खायला, प्यायला मिळाले नाही. त्यांना स्वतःचे हातपायही हलवता येत नव्हते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी मुलाचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर वृद्ध अंध दाम्पत्याला आंघोळ घालून त्यांना खाऊ-पिऊ घातले. चौकशीनंतर त्यांचा मोठा मुलगा प्रदीप सरूरनगर येथे राहत असल्याचे समजले. पोलिसांनी प्रदीपला प्रमोदच्या मृत्यूची माहिती देऊन त्याचा मृतदेह शासकीय रुग्णालयात हलविला. प्रदीप हैदराबादमध्ये आल्यानंतर अंध आई-वडिलांना त्याच्या ताब्यात देण्यात आले.