एपी, बीजिंग
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी शुक्रवारी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि इतर वरिष्ठ चिनी अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये ब्लिंकन दोन्ही देशांनी आपापसातील मतभेद जबाबदारीने हाताळण्यावर भर दिला. तर चीन व अमेरिकेने द्वेषपूर्ण स्पर्धा करण्याऐवजी काही बाबतीत सहमती साधावी अशी भूमिका जिनपिंग यांनी घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिका आणि चीनदरम्यानचे संबंध ताणलेले असतानाच दोन्ही देशांदरम्यान विविध पातळय़ांवर चर्चाही सुरू आहेत. या दौऱ्याचा शुक्रवारी तिसरा आणि शेवटचा दिवस होता. या तीन दिवसांच्या कालावधीत विविध वादग्रस्त द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक मुद्दय़ांवर चर्चा करण्यात आली.

चीन रशियाला आणि युक्रेनमध्ये केलेल्या आक्रमणाला पाठिंबा देत असल्याबद्दल आपण जिनपिंग यांच्याकडे चिंता व्यक्त केली असे ब्लिंकन यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच तैवान, दक्षिण चिनी समुद्र, मानवाधिकार आणि कृत्रिम अफुची निर्मिती व निर्यात हे मुद्देही त्यांनी उपस्थित केल्याची माहिती देण्यात आली. त्याबरोबरच अलिकडील काळामध्ये लष्करी संप्रेषण, अंमली पदार्थाविरोधात कार्यवाही आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्यामध्ये झालेल्या प्रगतीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

हेही वाचा >>>…फिर भी दिल है हिंदुस्तानी! पाकिस्तानमधील १९ वर्षीय आयेशावर भारतात यशस्वी हृदयरोपण शस्त्रक्रिया!

चीनकडून रशियाला होणाऱ्या लष्करी सामग्रीच्या पुरवठय़ाचा वापर युक्रेनविरोधातीलयुद्धासाठी केला जातो याबद्दल ब्लिंकन यांनी चिंता व्यक्त केली. चीनच्या पाठिंब्याशिवाय रशियाला  युद्ध सुरू ठेवता येणार नाही असे ते म्हणाले. 

यावेळी जिनपिंग यांनी सांगितले की, दोन्ही देशांनी एकमेकांशी आकसपूर्ण स्पर्धा करण्याऐवजी सहमती घडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. चीनला अमेरिकेची प्रगती पाहून आनंद होतो, अमेरिकेनेही चीनच्या विकासाकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे अशी आमची अपेक्षा आहे असे जिनपिंग यांनी सांगितले.

द्विपक्षीय तणाव

अमेरिकेच्या अर्थमंत्री जेनेट येलेन यांनी या महिन्याच्या सुरुवातीला चीनचा दौरा केला होता. त्यांच्या नंतर ब्लिंकन यांनी चीन दौरा केला. दोन्ही देशांदरम्यान मुख्यत आर्थिक आणि लष्करी सामर्थ्यांच्या मुद्दय़ावरून तणाव आहे. चीनचे रशिया आणि उत्तर कोरियाबरोबरचे सहकार्याचे संबंध अमेरिकेला पसंत नाहीत. त्याविषयी अमेरिकेने वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे.   

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blinken calls for handling differences responsibly in talks with xi jinping amy
Show comments