इंग्रजी ही भविष्याची भाषा आहे आणि येत्या काळात रोजगार मिळवायचा असेल तर इंग्रजीला पर्याय नाही, अशी आपल्याकडे लोकांची सर्वसाधारण धारणा आहे. इंग्रजी सफाईदारपणे बोलू शकणाऱ्यांच्या चटपटीतपणाला भुलणाऱ्या लोकांच्या गळी हा समज उतरविणे अत्यंत सोपे असते. पण वास्तविक परिस्थिती वेगळेच काही सांगते. प्रादेशिक भाषा म्हणून हिणविण्यात येणाऱ्या भारतीय भाषा तेवढ्याच समर्थ आहेत आणि आगामी काळात रोजगार असो वा व्यापार, याच भाषा सद्दी गाजवणार आहेत, हे आता स्पष्ट होत आहे.
इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया (आयएएमआय) ही मोबाईल कंपन्या आणि इंटरनेट पुरवठादारांची देशातील सर्वात मोठी संघटना. गेल्या महिन्यात या संघटनेने आपला एक अहवाल जाहीर केला, त्यात म्हटटले आहे, की या वर्षीच्या शेवटापर्यंत भारतात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या ३९ टक्क्यांनी वाढेल आणि हे मुख्यतः स्थानिक भाषांमधील आशयामुळे घडेल. याचे कारण आज आंतरजाल वापरणारे बहुतांश लोक इंग्रजी जाणणारे किंवा बोलणारेच आहेत, त्यामुळे येथून पुढील वाढ ही देशी भाषांमध्येच होईल. आजकाल चायनीज फोनमध्येही देवनागरी टंकलेखनाची सोय दिलेली असते, ती उगाच नाही.
देशात शहरी भागांमध्ये इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या सुमारे २० कोटी आहे आणि त्यातील सुमारे ९ कोटी लोक स्वतःच्या भाषांमध्येच इंटरनेट वापरतात. हे प्रमाण जवळपास ४५ टक्के एवढे आहे तर ग्रामीण भागांमध्ये ८ कोटी १० लाख लोक इंटरनेट वापरतात, त्यांपैकी ५७ टक्के म्हणजे ४ कोटी ६० लाख लोक स्वभाषेत त्याचा वापर करतात, असे हा अहवाल सांगतो.
अहवालात असेही म्हटले आहे, की भारतीय भाषांमधून इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दरवर्षी ४७ टक्क्यांनी वाढते आहे. केवळ इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या वाढल्याने भाषेचे भले कसे होणार, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचेही उत्तर तयार आहे. स्वभाषेत इंटरनेट वापरणारे वाढणार तसे त्या त्या भाषांमधून डिजिटल जाहिरातीही वाढणार आहेत. येत्या पाच वर्षांमध्ये भारतीय भाषांमधून डिजिटल जाहिराती ३० टक्क्यांनी वाढणार असल्याचा एक अंदाज आहे.
केवळ आयएएमआय कशाला, गुगलसारखी जगड्व्याळ कंपनी ही आता भारतीय भाषांवर अधिक लक्ष देऊ लागली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गुगलने खास भारतीय भाषांसाठी इंडियन लँग्वेजेस इंटरनेट अलायन्स (आयएलआयए) नावाची संस्था स्थापन केली. या अंतर्गत आंतरजालावरील हिंदी मजकूर एकत्रित करणारे एक पोर्टल – हिंदीवेब.कॉम सुरू करण्यात आले. अन्य भारतीय भाषांचा त्या मागोमाग क्रम येणार, हे ओघाने आलेच. या संस्थेचे उद्घाटन करताना माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावेडकर यांनी भारत सरकार या संस्थेला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे जाहीर केले होतेच.
आंतरजालाच्या प्रारंभिक काळात म्हणजे २००० सालापर्यंत आंतरजालावर इंग्रजीचे आधिपत्य होते. आंतरजाल वापरणारे तसेच आंतरजालावरील मजकूर, या दोन्हींशी इंग्रजीचाच अतूट संबंध होता. २००० साली आंतरजालावरील एकूण मजकुरात इंग्रजी मजकूर ५१.३ टक्के होता, हेच प्रमाण २००५ मध्ये ३२ टक्के एवढे खाली आले. एखादे संकेतस्थळ दोन भाषांत उपलब्ध असेल, म्हणजे स्थानिक भाषा व इंग्रजी भाषा, तर संकेतस्थळाच्या इंग्रजी आवृत्तीचा वापर कमी होतो, असे अमेरिकेतील पाहण्यातून दिसून आले आहे.
‘आयएलआयए’मध्ये इंटरनेट उद्योगातील १८ भागीदार आहेत आणि भारतीय भाषांमधील ऑनलाईन मजकूर निर्मिती, एकत्रीकरण आणि त्याचा शोध यासाठी हे भागीदार प्रयत्न करणार आहेत. वर्ष २०१७ पर्यंत ४० कोटी भारतीय लोकांना स्वभाषेतून आंतरजालाचा वापर करता यावा, या दिशेने हे सर्व जण प्रयत्न करतील.
आंतरजालाच्या पलीकडे, गेल्या वर्षीच्या भारतीय वाचक सर्वेक्षणाचे आकडे पाहिले तरी बहुतांश इंग्रजी माध्यमांची वाढ थांबली आहे किंवा कुंठीत तरी झाली आहे. बहुतांश वृत्तपत्रांची वाढ दुसऱ्या आणि तिसऱ्या थरातील शहरांमध्ये (महानगरे सोडून) झाली आहे आणि तेही मुख्यतः भारतीय भाषांमधील प्रकाशनांमध्येच.
इंग्रजीच्या अति प्रसाराचा एक गैर-फायदा कसा होतो, हे खुद्द एका इंग्रज लेखकाच्या पुस्तकावरूनच कळून येते. पाच-सहा वर्षांपूर्वी इंग्रजी भाषेच्या भवितव्यासंदर्भात ब्रिटीश काऊन्सिलने डेव्हिड ग्रॅडॉल यांना अभ्यास करण्यास सांगितले. ग्रॅडाल यांचा अहवाल ‘इंग्लिश नेक्स्ट’ या नावाने प्रसिद्ध आहे (आणि इंग्रजीतील अन्य साहित्याप्रमाणेच आंतरजालावर मोफत उपलब्ध आहे). त्यात ग्रॅडॉल म्हणतात, “युरोपीय महासंघात (आणि जगात इतरत्रही) इंग्रजी शिकणे तुलनेने स्वस्त आहे परंतु अन्य भाषा शिकण्यासाठी जास्त खर्च येतो. त्यामुळे परकीय भाषा म्हणून इंग्रजी शिकण्यातून मिळणारे उत्पन्न येत्या काळात कमी होण्याची शक्यता आहे.”
आता इंग्लंड सरकारला मिळणारे उत्पन्न ज्या प्रमाणे कमी होईल, त्याच प्रमाणे आपल्याकडील इंग्रजी शिक्षकांना मिळणारे पैसे कसे कमी होतील, याचे चित्र नजरेसमोर आणा, म्हणजे मी काय म्हणतोय ते कळेल. आजच गावोगावी पर्सनालिटी डेव्हलपमेंटच्या नावाखाली इंग्रजी शिकविणाऱ्या वर्ग फोफावल्यामुळे त्यांचे ‘फी आणि मार्जिन’ कसे कमी झाले आहेत, याच्या अनेक कथा ऐकू येतील.
गेल्या निवडणुकीत डेव्हिड कॅमेरून यांनी ज्या प्रकारे हिंदी भाषेतून मतदारांना साद घातली आणि अमेरिकेत जेब बुशसारखा कन्झर्वेटिव्ह पक्षाचा उमेदवार स्पॅनिशमध्ये बोलून मतदारांना रिझविण्याची जॉर्ज बुश आणि बराक ओबामांची परंपरा चालवतोय. याचाच अर्थ बहुभाषकता अद्याप शाबूत आहे. अमेरिकेत आणि इतरत्रही.
या सगळ्याचा मथितार्थ एवढाच, की केवळ इंग्रजी येणे म्हणजे पुढच्या प्रगतीची दारे आपोआप खुली होणे नव्हे. एवढी आकडेवारी विस्ताराने देण्याचे कारण म्हणजे माझी भाषा ही कदाचित जगाची भाषा नसेल, पण तिला भविष्य आहे आणि ती भविष्याची भाषा आहे, हा आत्मविश्वास यातून मिळू शकतो. एवढे साध्य झाले तरी झाले.
– देविदास देशपांडे
devidas@didichyaduniyet.com
BLOG : माझी भाषा – भविष्याची भाषा
केवळ इंग्रजी येणे म्हणजे पुढच्या प्रगतीची दारे आपोआप खुली होणे नव्हे
Written by विश्वनाथ गरुड
Updated:
आणखी वाचा
First published on: 05-09-2015 at 01:15 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blog by devidas deshpande on future of marathi language