अखिल महाराष्ट्राला ज्याची प्रतीक्षा होती असे घुमान येथील साहित्य संमेलन पार पडले. नुसते पार पडले नाहीतर पंजाब सरकारच्या मेहरबानीवर अत्यंत जल्लोषात पार पडले. महाराष्ट्रातील माणसे येथे येऊन पंजाबच्या संस्कृतीचे गुणगान गातायत म्हणून पंजाबी माणसे जोशात तर सर्व काही फुकटात आणि आयते मिळते, शिवाय वर पंजाबची सैर मोफत म्हणून महाराष्ट्रातील माणसे खुश. अशा रितीने दोन्ही संस्कृतीचा मिलाफ होत घडवून आणणाऱ्या या संमेलनात भाषेवर चर्चा होणे तसे अपेक्षित नव्हते. तरीही संमेलनात भाषेवर चर्चा झाली आणि चांगली झाली. नेहमीच्या रटाळ वळणांवरून न जाता काही चांगले विचार या संमेलनात मांडण्यात आले.
प्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञ गणेश देवी यांची मुलाखत हा अशाच कार्यक्रमांपैकी एक. देवी यांचा केवळ मराठी आणि गुजरातीच नव्हे तर अनेक आदिवासी भाषांचाही चांगला अभ्यास आहे. या मुलाखतीत बोलताना देवी यांनी एक मोठा विचार मांडला. भारतीय माणसे मुळातच बहुभाषिक आहेत. मात्र जसजशी व्यक्ती शिकत जाते तसतशी तिच्या भाषिक क्षमता कमी होऊन ती एकभाषक होते, असे निरीक्षण त्यांनी मांडले.
गणेश देवी यांनी वरील निरीक्षण मांडल्यानंतर १०-१५ मिनिटांच्या आत माजी संमेलनाध्यक्षांच्या अर्कचित्रांच्या दालनात काही व्यंगचित्रे पाहणारी एक पंजाबी व्यक्ती भेटली. बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रांतील मराठी अक्षरे ही व्यक्ती वाचत होती आणि त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होती. त्यातील काही शब्दांचा अर्थ मी त्याला सांगितला तसा त्याला पूर्ण वाक्य कळाले. थोड्या वेळाने तो म्हणाला, “ज्यादा अलग नहीं है हिंदी से. मुश्किल नहीं है.”
काही वर्षांपूर्वी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक-नाटककार गिरीश कार्नाड यांनी देवी यांच्या प्रमाणेच मत व्यक्त केले होते. भारतात पूर्वीपासून विद्यार्थ्यांना बहुभाषक शिक्षण देण्यात येत होते. मात्र इंग्रजी माध्यमांमध्ये शिकणाऱ्या मुलांवर एकभाषकत्व लादण्यात येत आहे, असा त्यांचा सूर होता. याबद्दल पुण्यात त्यांना मी एकदा विचारलेही होते. त्यावर त्यांनी आपल्या विधानाची पुष्टी करत असेही सांगितले, की हा विषय खूप गुंतागुंतीचा आहे.
ज्याअर्थी एवढ्या विद्वान व्यक्ती आणि तज्ञ भाषेबाबत वरील मत व्यक्त करत आहेत, त्याअर्थी यात काहीतरी तथ्य असायलाच पाहिजे. येथे एकभाषकत्व या शब्दाचा अर्थ इंग्रजी असा होतो. कारण मराठीच नव्हे, हिंदी आणि अन्य भारतीय भाषांमध्येही इंग्रजीची हेकेखोरी हा चिंतेचा विषय आहे. इंग्रजीमुळे अन्य भारतीय भाषांचा लोप होत आहे, हे मत आसेतू हिमाचल व्यक्त होत असते. फक्त मराठीजनांपर्यंत पोचतेच असे नाही. विविध भाषकांना लागलेली ही काळजी घुमानच्या निमित्ताने मराठी लोकांना कळाली असावी, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
याचे कारण म्हणजे या संमेलनात विविध व्यासपीठांवरून याच प्रश्नाचे वेगवेगळे दृष्टीकोन मांडण्यात आले. म्हणजे पंजाब केसरी या हिंदी दैनिकाचे संपादक विजय चोप्रा म्हणाले, की इंग्रजी ही आधुनिक जगाची भाषा आहे आणि आपल्या मुलांना पुढे जायचे असेल, तर तिचा अंगीकार करावाच लागेल. एवढेच की, आपल्याला आपल्या भाषा किंवा संस्कृतीचा त्याग करून चालणार नाही.
दुसरीकडे संहितेवरील चर्चा पूर्णपणे मराठीतील इंग्रजी शब्दांच्या वापराकडे वळली आणि आपल्या भाषेत किती इंग्रजी शब्द असावेत, यावर मत-मतांतरे व्यक्त झाली. राजन खान यांनी तर ‘किमान भाषेतील मराठी शब्दांच्या बाबतीत मी सावरकरवादी आहे’ असे स्पष्टपणे सांगितले.
अशा चर्चांमध्ये पुराणकाळापासून येणारा एक मुद्दा, म्हणजे मराठी साहित्यिकांची मुले इंग्रजी माध्यमात शिकतात, सुदैवाने या चर्चेत आला नाही. त्या अर्थाने हे संमेलन ऐतिहासिकच म्हणायला पाहिजे. परंतु या चर्चासत्रात बोलतानाही वक्त्यांनी हाच मुद्दा उपस्थित केला, की साध्या साध्या आणि रूढ झालेल्या शब्दांनाही आपण इंग्रजी शब्द वापरतो आहोत आणि त्यामुळे आपली संस्कृतीच धोक्यात आली आहे.
याचा सगळ्याचा लसावि काढायचा झाला, तर असे म्हणावे लागेल, की इंग्रजी शिक्षणामुळे लोकांचा आपली भाषा वापरण्याकडे कल कमी होतो. परंतु स्वदेशाची आणि स्वभाषेची सेवा करणाऱ्या स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा गांधी आणि स्वा. सावरकर अशा थोर व्यक्तींकडे पाहिल्यास त्यांचे शिक्षण तर इंग्रजीतूनच झाले होते. म्हणजे ब्रिटिशांच्या काळात इंग्रजीतून शिकणाऱ्या व्यक्ती स्वभाषेच्या कट्टर प्रचारक आणि स्वतंत्र हिंदुस्थानात जन्मलेल्या आणि थोडीफार मातृभाषा शिकलेल्या व्यक्ती इंग्रजीच्या दुर्दम्य प्रशंसक असा विरोधाभास आपल्याला दिसतो.
याचा अर्थ समस्या इंग्रजीत नसून समस्या आपल्या शिक्षण आणि संस्कारांत आहे. घुमानच्या व्यासपीठावर एका वक्त्याने ही समस्या खालील शब्दांत मांडली – “एखाद्या मोलमजुरी करणाऱ्या महिलेच्या मुलीला इंग्रजी शाळेत दाखला मिळाला, की तिला ग्रॅज्युएट झाल्यासारखा आनंद होतो.”
हा आनंद जोपर्यंत राहील, तोपर्यंत साहित्य संमेलन घुमानलाच काय,मंगळावर झाले तरी मराठी भाषेच्या भवितव्याची चर्चा होतच राहील.
– देविदास देशपांडे
devidas@didichyaduniyet.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)
BLOG : मराठीच्या भवितव्याची चर्चा तोपर्यंत होतच राहील!
अखिल महाराष्ट्राला ज्याची प्रतीक्षा होती असे घुमान येथील साहित्य संमेलन पार पडले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-04-2015 at 01:05 IST
TOPICSघुमान
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blog by devidas deshpande on ghuman marathi sahitya sanmelan