‘मुख्यमंत्री जे आहेत ते आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत’
‘पाऊस जो आहे तो अजूनही पडत नाहीये.’
‘अधिकारी जे आहेत ते माहिती जी आहे ती देत नाहीत.’
या वाक्यांनी तुम्हाला विचलित व्हायला होत असेल, तर त्याचा अर्थ तुम्ही मराठी वृत्तवाहिन्या पाहत नाही. पाहत असाल तर एव्हाना अशा वाक्यांची तुम्हाला सवय व्हायला हवी होती. द्राविडी प्राणायाम हा केवळ वाक्प्रचार म्हणून आपल्याला परिचित आहे. मात्र वाहिन्यांवरील ही ‘बोली’ ऐकली, की त्या वाक्प्रचाराचा पूर्ण अर्थ आपल्याला कळून चुकतो.
खरे तर मराठीला असे एवढे वळसे घालून बोलण्याची काही गरज नाही. ज्ञानेश्वर-तुकारामादी संतांनी सुदैवाने आमच्यावर एवढे उपकार केले आहेत, की बंदुकीतून सुटलेल्या गोळीप्रमाणे थेट वाक्य बोलायला काहीही श्रम पडत नाहीत. ‘यह जो विषय है वह काफी जटिल है,’ अशा हिंदी वाक्यांचे हे मराठीवर केलेले कलम आहे. किंबहुना मराठीतील बहुतांश निवेदक मराठीतून हिंदीच बोलतायत की काय, अशी शंका घ्यायला जागा आहे. (गौप्यस्फोट किंवा रहस्योद्घाटन अशा शब्दांच्या जागी खुलासा म्हणणे अशा उदाहरणांबद्दल तर आपण बोलूयाच नको.)
मराठीच्या शब्दरचनेवर ‘जी’झिया लावण्याची सुरुवात आधी जाहिरातींतून झाली. जाहिरात संस्थांमधील उपलब्ध मनुष्यबळ, मराठीतील भाषांतरासाठी ‘पैसे फेकायची’ त्यांची तयारी आणि हे काम करणाऱ्या माणसांची क्षमता, या सर्वांचा विचार केला तर त्या क्षेत्रातील मराठीची दुरवस्था समर्थनीय नसली, तरी समजून घेता येण्यासारखी आहे. ‘कशीही खिचखिच, बोला बिना हिचकिच’ हा एक मासला त्यासाठी पुरे. हे वाक्य नक्की कुठल्या भाषेत आहे? हे असं काही ऐकल्यावर घसा कितीही मोकळा झाला तरी बोलती तर बंद होणारच! पण घेता घेता देणाराचे हात घ्यायचे म्हणून वाहिन्यांनी जाहिरातदारांचेच शब्द घ्यायला सुरुवात केली.
प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांच्याशी गप्पा मारताना त्यांनी अनेकदा सांगितलेली आठवण येथे सांगण्याजोगी आहे. पत्रकाराची नोकरी सोडल्यानंतर काही काळ गाडगीळ यांनी कॉपीरायटर आणि भाषांतरकार म्हणून काम केले. “’तो साबण जो तुमची त्वचा उजळवतो’ असे भाषांतर त्यावेळी सर्रास चालायचे. तेव्हा मी ‘तुमची त्वचा उजळवणारा साबण’ असे वाक्य करायचो. ते लोकांना आवडू लागले आणि मला भराभर कामे मिळत गेली,” असे गाडगीळ सांगतात.
अर्थात गाडगीळ यांची आठवण साधारण ३५ वर्षांपूर्वीची आहे. त्या नंतर मुंबईच्या समुद्रात अनेक गटारांचे पाणी येऊन मिळाले आणि पुण्यात मुठेतील पाणी धरणातून विसर्ग झाला तरच व्हायला लागले. नाशिकमध्ये गोदावरीचे प्रवाह पंचवटीतही तुंबू लागले आणि कोल्हापुरात पंचगंगेतील पाणीही रोगट बनले. सांगायचे तात्पर्य म्हणजे भाषिक प्रदूषणाचे अनेक प्रवाह बळकट झाले आणि म्हणून गाडगीळांच्या योग्य भाषेला मिळालेली दाद आता अलम महाराष्ट्रात कुठेही मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. नव्हे, भाषिक योग्यपणाचा (शुद्धतेचा नव्हे!) आग्रह धरणाऱ्यांचीच चेष्टा होण्याचे दिवस आहेत.
लोकांना भाषा कळाली पाहिजे, सामान्य लोकांच्या भाषेत बोलले पाहिजे, अशा सबबींच्या आड आपला आळस आणि दुर्बलता लपविण्यात येतात.
सुदैवाने छापील माध्यमांमध्ये ही साथ अजून पसरलेली नाही. (या सुदैवाचाही वापर अवधी संपत आल्यासारखाच आहे). छापील माध्यमांमध्ये मजकुरातील बेशिस्त ‘जी आहे ती’ खपून जात नाही कारण मुद्रीत शोधक नावाचा चौकीदार तिथे उभा असतो. लोकांच्या नजरा खेचण्यासाठी स्पर्धा करणाऱ्या वाहिन्यांनी ती चैन कुठली परवडायला? मग जीभेवर येतील ते संसदीय शब्द वापरून रिकाम्या जागा भरण्याचा खेळ सुरू होतो.
घुमानच्या साहित्य संमेलनात माध्यमे आणि भाषा अशा विषयावरील परिसंवादात लेखक राजन खान यांनी वर्मावरच बोट ठेवले होते. एका वाहिनीच्या संपादकाला बोलताना त्यांनी थेट सुनावले, “आता आपण हा विषय समजून घेऊ ग्राफिक्सच्या माध्यमातून, असे तुमचे निवेदक म्हणतात तेव्हा आमच्या पोटात गोळा येतो.” याला कारण त्यांनी शब्द आणि वाक्यरचनेचा होणारा गोंधळ, असे दिले होते. संबंधित वाहिनीवरील ग्राफिक्सचे प्रमाण त्यानंतर आटल्याचे एक निरीक्षण आहे.
वाहिन्यांवरील पाट्यांची भाषा सुधारली तरी बोलण्याची भाषा दिवसेंदिवस ‘हिंदाळत’ आहे. एखादे वाक्य सरळसोट ऐकणे अगदीच दुर्मीळ होत चालले आहे. त्यामुळे खान यांनी ज्याप्रकारे थेट सुनावले होते, तसे आता मराठी योग्य कशी बोलावी, यासाठीही कोणा अधिकारी व्यक्तीने कान टोचायची गरज आहे.
– देविदास देशपांडे
devidas@didichyaduniyet.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)

Story img Loader